vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता**मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22 हजार 611 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता*

गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता**मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22 हजार 611 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता*

 

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17 हजार 36 कोटी; तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1ए आणि मार्ग 2 च्या 5 हजार 575 कोटी, अशा एकूण 22 हजार 611 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल; तसेच राष्ट्रीय महामार्ग-48च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार असून, त्याचा व्यास 14 मीटर असेल. सुमारे पाच वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे.

घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः ठाणे व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे; तसेच प्रकल्प परिसरात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मान्यता दिली.

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग 2 (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-4) या प्रकल्पास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग 1ए वर दोन आणि मार्ग 2 वर अकरा स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानसर्व मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मतदान पथके साहित्य घेऊन रवाना, पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 159 मतदान केंद्रे असून 88 हजार 70 मतदार- शिक्षक मतदारसंघासाठी 48 मतदान केंद्रे असून 8 हजार 62 मतदार

vishwatmaklokswamivarta

अमृतच्या लक्षित घटकातील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज- आराखडा तयार करा-वीज उपकेंद्राच्या जागेसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकाेरे-बोर्डीकर यांच्या वीज अधिकाऱ्यांना सूचना..

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी