अमृतच्या लक्षित घटकातील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण
सांगली, मराठी मूवी : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्यामार्फत अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन 2026-27 या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत पूर्व प्रशिक्षणासह विद्यावेतन, आकस्मिक खर्च व प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे अमृत चे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या उपक्रमांतर्गत एकूण 800 उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा, संयुक्त गट-ब, संयुक्त गट-क, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, कर्मचारी निवड आयोगाची (SSC) परीक्षा, बँकिंग परीक्षा, पोलीस व मिलिटरी भरती तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
परीक्षानिहाय 800 जागा,या योजनेंतर्गत UPSC नागरी सेवा परीक्षा (दिल्ली) 30, UPSC नागरी सेवा परीक्षा (महाराष्ट्र) 30, MPSC राज्यसेवा 175, MPSC अभियांत्रिकी सेवा 25, MPSC न्यायिक सेवा 25, MPSC संयुक्त गट-ब 175, MPSC संयुक्त गट-क 175, SSC 25, बँकिंग 70, पोलीस व मिलिटरी भरती 20 आणि TET 50 अशा एकूण 800 जागा उपलब्ध आहेत.
विद्यावेतनासह प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य,प्रशिक्षणाच्या प्रकारानुसार पात्र लाभार्थ्यांना दरमहा 6 हजार ते 13 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन, 10 हजार ते 18 हजार रुपयांपर्यंत आकस्मिक खर्च तसेच 40 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय सहाय्य देण्यात येणार आहे. UPSC दिल्ली प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. विद्यावेतनाचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रशिक्षणामध्ये किमान 75 टक्के उपस्थिती आवश्यक राहणार आहे.
CETच्या गुणांनुसार निवड,प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) मधील गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. एकूण जागांपैकी 30 टक्के जागा महिलांसाठी, 5 टक्के जागा दिव्यांगांसाठी आणि 2 टक्के जागा अनाथ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या नियमानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. एका लाभार्थ्यास एका आर्थिक वर्षात एकाच प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल, तसेच आयुष्यात जास्तीत जास्त दोन वेळा प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे
23 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज,या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 9 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून, 23 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ : https://amrutcet2026.cbtexam.in/IEST/index.html हे आहे. तांत्रिक अडचण अथवा अर्ज भरताना Error आल्यास संबंधित Error चा स्क्रीनशॉट सोबत घेऊन ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल. ई-मेल : amrutcet2026helpdesk@gmail.com. हेल्पलाईन क्रमांक : 022-65475009. हेल्पलाईनची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
अमृतच्या लक्षित गटातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर करण्यासाठी तयारी करावी आणि पात्र उमेदवारांनी मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन अमृततर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर, राजवाडा, सांगली-416416.