vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी  : जिल्ह्यातील सर्वधर्मीय सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा असून मोहरम सणही त्याच शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करून जिल्ह्याची ही परंपरा अबाधित ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मोहरम सणाच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. टिपरसे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुदगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समिती सदस्य आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, मोहरम सणादरम्यान मिरवणुकीच्या मार्गांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. मिरवणूक मार्गावरील स्ट्रीट लाईट कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच जीर्ण आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची तातडीने दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात. उत्सवादरम्यान अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विद्युत विभागाचे विशेष पथक उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मिरवणुकांना अडथळा ठरणारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर व फलक तातडीने हटविण्यात यावेत. तसेच धोकादायक इमारती किंवा इतर संभाव्य जोखमीच्या ठिकाणी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथके, स्वच्छता सुविधा, फिरती स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन म्हणाले की, मोहरम सणादरम्यान पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांतता आणि सौहार्द कायम राखावे. समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही अफवा अथवा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासन आपल्या सोबत असून सर्वांनी जबाबदारीने वागून सण उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीत समाज प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना व मागण्यांवर संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

00000

संबंधित पोस्ट

डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta