
*विषमता मिटवून दलित सवर्णांना जोडण्याचे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा*
मुंबई प्रतिनिधी – भारत एक राष्ट्र म्हणून मजबूत उभे राहण्यासाठी सामाजिक विषमता नष्ट केली पाहिजे. जातीभेद मिटविले पाहिजेत. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी दलित सवर्ण समाजाला जोडण्याचे सुरुवातीपासून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये 7 ट्रस्टी हे दलित आणि 4 ट्रस्टी हे सवर्ण समाजातून घेण्याचा नियम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. दलित सवर्ण समाजाला जोडण्याच्या मिशन चे ते द्योतक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे दलित सवर्णाना जोडण्याचे मिशन आपण पूर्ण करूया असे आवाहन पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिनांक ८ जुलै १९४५ साली स्थापन केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा मी अध्यक्ष झालो याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन ना.रामदास आठवले यांनी केले.
दलित समाजाने आपल्या उद्धारासाठी शिक्षण घेतले पाहिजे.त्यासोबत सर्वच जाती धर्मियांनी शिक्षण घेतले पाहिजे.सर्वच गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे;नोकरी करून शिक्षण घेता यावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून मुंबईत सिद्धार्थ कॉलेज मध्ये सकाळ आणि संध्याकाळचे वर्ग सुरू केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर व्हॅली मध्ये 7 धरण बांधून धरणातून वीजनिमिर्तीची संकल्पना देशाला पटवून दिली.नदीला महापूर येऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पाऊस पाण्या विना होणारा दुष्काळ टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली.त्याची अंमलबजावणी एवढ्या वर्षात कोणी केली नसली तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नदीजोड प्रकल्प देशात सुरू केले आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विषयात सखोल ज्ञान होते. प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रूपी या प्रबंधावरून रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकावरून देशात भाषावार प्रांत रचना झाली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वाधिक उत्कृष्ट संविधान आहे.असे गौरवोद्गार ना.रामदास आठवले यांनी यावेळी काढले.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिवस आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले.बहुजन समाजाला शिक्षणाचा महामंत्र दिला.पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे कार्य आजही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या द्रष्टेपणाची साक्ष देत आहे असे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी ए सोसायटी चे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले होते. तसेच संस्थेचे विश्वस्त-सचिव डॉ. वासुदेव गाडे, पद्मश्री उज्वल निकम, ऍड. बि. के. बर्वे, श्री. अरविंद सोनटक्के, डॉ. वेंकटस्वामी, विपश्यनाचार्य भदंत्त राहुल बोधी व कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे विचारपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे यांनी केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे अधिकृत अध्यक्ष आपण आहोत मात्र काही लोक बेकायदेशीर स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष मानत आहेत.याबाबत झालेल्या वादावर धर्मादाय आयुक्तांनी रामदास आठवले हेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष असा दोन वेळा अधिकृत निर्णय दिला आहे.त्याविरुद्ध उच्च न्यायालयात गेलेल्या लोकांचा दावा न्यायालयाने नाकारला आहे.राज्य सरकार च्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने याबाबत चे सर्व पुरावे तपासून पी ए सोसायटी चे अधिकृत अध्यक्ष म्हणून ना. रामदास आठवले यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे जे लोक स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून बेकायदेशीर कामकाज करतात त्यांना रोखण्यासाठी आणि पी इ सोसायटी संस्थेच्या सर्व प्रिन्सिपॉल यांनी कायदेशीर अध्यक्षांच्या सूचना आदेश पाळावेत याबाबत राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देश द्यावेत अशी जाहीर मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.
मागिल ४ वर्षांपासून या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिग्गजांना, महामहीम राज्यपाल जिष्णू वर्मा व पीईएसचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते *’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -२०२६’* प्रदान करून सन्मानित करण्यात येते. ती परंपरा कायम ठेवत आज देखील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कला- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -२०२६’ देऊन त्यांना राज्यपाल जिष्णू वर्मा व रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या माजी उपसभापती श्रीमती निलमताई गोऱ्हे, पद्मश्री अशोक (आबा) खाडे साहेब, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ विनय राऊत, सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश खानविलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाडी, कोल्हापूरचे संचालक श्री. नंदकुमार गोंधळी, के. जे. सोमय्या विद्याविहार कॉलेजचे प्राचार्य डॉ. किसन पवार, सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विजय मोहिते, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सचिव श्री. नागसेन कांबळे, तसेच सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे व प्राध्यापक डॉ. विजय मोरे इत्यादीना, प्रमुख पाहुणे महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा व संस्थेचे अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी प्रेक्षकांमध्ये सौ.सीमाताई आठवले ; पप्पू कागदे; सोहेल शेख;दयाळ बहादुर;सचिन भाई मोहिते; संजय पवार,प्रकाश जाधव; अमित तांबे,रवी गायकवाड सुमित मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.स्वागतपर भाषण पद्मश्री ऍड. खासदार उज्वल निकम यांनी केले व ऍड. बि. के. बर्वे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे स्वागत ना. रामदास आठवले यांनी शाल, पुष्पगुच्छ ग्रंथ प्रदान करून केले. तसेच विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पीईएसच्या कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे यांनी केलेसंपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्री चंद्रशेखर कांबळे प्रशांत मोरे, धर्मराज ब्राम्हणे व अश्विन वाघ यांनी सहकार्य केले. 00000



