
देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे-महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात केले आवाहन 40 कोटीतून मेळघाटातील दुर्गम भागातील 22 गावांमध्ये वीज
राज्य प्रतिनिधी
महाराष्ट्र व देशातील अभियंत्याची देशाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका राहिली आहे. आता 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. अंधारात राहणाऱ्या मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागात अभियंत्यांच्या मेहनतीमुळे वीज पोचली असून अंतिम 22 गावांमध्ये 40 कोटी निधीतून सोलर लाईन टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील अभियंता भवनात दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावती सेंटरच्या वतीने आयोजित ’41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात’ ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री .बावनकुळे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र व देशाच्या उर्जा क्षेत्र विकासातही अभियंत्यांनी महत्वाची भूमिका वठविली आहे. दीर्घकाळ अंधारात असलेल्या एलिफंटा येथील ऐतिहासिक घारापुरी लेण्यांमध्ये 7 किमीच्या समुद्रातून केबल प्लेट टाकून राज्य शासनाच्या महावितरण आणि पारेषण कंपन्यांच्या अभियंत्यांनी अभूतपूर्व कार्य केले आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना प्रांरभिक अंमलबजवणी काळात अभियंत्यांच्या योगदानामुळे मिळालेल्या यशावर त्यांनी प्रकाश टाकला.
मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागातील अंधारात राहणाऱ्या 300 गांवामध्ये वीज पोचविण्यात अभियंत्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.यातील शेवटच्या 22 गावांमध्ये 40 कोटींच्या निधीतून सोलर लाईनच्या माध्यमातून वीज पोचविण्योच शिवधनुष्यही अभियंत्यांनी उचलल्याचे त्यांनी सांगितले. सौर पंपाद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात महारष्ट्राने देशात अग्रस्थान मिळविले आहे व त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. अभियंत्यांनी विकसित भारताचे लक्ष पूर्ण करण्यातही महत्वाचे योगदान द्यावे असेही ते म्हणाले.
विद्युत क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार, एनआयटी इटानगरचे (अरुणाचल प्रदेश) संचालक डॉ. मोहन आवारे आणि मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रताप पवार या अभियंत्यांचा इमिनंट इंजिनियर पुरस्काराने तर डॉ एस. हेमवती, डॉ.एस.जयंती आणि प्रियम जैन या अभियंत्यांचा यंग इंजिनिअर पुरस्काराने गौरव करण्यात आला. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून इंजिनियर फिटनेस सेंटरचे उद्घाटन झाले. दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे संयोजक आनंद जवंजाळ यांनी प्रास्ताविक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता व हरित तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी देशात विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
०००००००



