vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा एक अंश जरी अंगिकारला तरी समाजाचा विकास होईल – महापौर श्रीम.सुजाता पाटील  

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा एक अंश जरी अंगिकारला तरी समाजाचा विकास होईल – महापौर श्रीम.सुजाता पाटील

 

     नवी मुंबई प्रतिनिधी   लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामधून जीवनातील वास्तवाचे दर्शन घडते, त्यामुळे त्यांच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वाचा एक अंश जरी आपण अंगिकारला तरी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आपला खूप विकास होईल असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी शिक्षण हाच समाजाच्या उन्नतीचा मार्ग असल्याने आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्या अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. .

          नवी मुंबई महानगरपालिका समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव प्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती श्रीम.रंजना सोनवणे व उपसभापती श्रीम.सुरेखा नरबागे, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.ललिता मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार, विधी समिती सभापती ॲड.सायली शिंदे, नगरसेविका श्रीम.अनिता मानवतकर व ॲड. श्वेता शिंदे, माजी नगरसेविका श्रीम.काशिबाई लांडगे व श्रीम.मिना पाचारणे, अ.भा.मातंग समाज अध्यक्षा श्रीम.कुसुमताई गोपले, व्याख्याते श्री.बी.एन.गायकवाड, समाजविकास विभाग उपआयुक्त श्री. प्रकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

          शहराची उंची इमारतींमधून नाही तर सर्वसामान्य माणसाच्या सन्मानातून वाढते असे सांगत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी अण्णा भाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले, पण पुढे त्यांनी अनुभवाच्या शाळेत एकलव्यासारखे शिक्षण घेऊन जगभरातील लोकांना अचंबित करेल अशी साहित्यरचना केली यापासून बोध घेऊन प्रत्येक समाज बांधवाने आपल्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण मिळण्यासाठी निर्धार करावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिकेने काळाची पावले ओळखून गोरगरीबांच्या मुलांना पहिलीपासून इंग्रजी शिक्षण सुरू केले असून शिक्षणच आपला उध्दार करू शकते हे लक्षात ठेवून व्यसनापासून दूर रहावे व उत्तम शिक्षणावर भर द्यावा असेही त्यांनी आवाहन केले.

          यावेळी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणा-या तसेच पदव्युत्तर, पदवी, बारावी, दहावी परीक्षेतील गुणवंत अशा मातंग समाजातील बंधू-भगिनींचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. अ.भा.मातंग समाज अध्यक्षा श्रीम.कुसुमताई गोपले व श्री.सुभाष काळे यांनीही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाहीर सुनिल साठे यांनी आपल्या सहका-यांसह अण्णा भाऊंची कवने सादर करून श्रोत्यांची दाद घेतली.

 

लोकशाहीर अण्णा भाऊंसारखा लेखक जगाच्या इतिहासात होणे नाही – संमेलनाध्यक्ष श्री.विश्वास पाटील जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी व ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान्’ पुस्तकाचे लेखक, ‘पानिपत’कार श्री. विश्वास पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते श्री.विश्वास पाटील यांचा नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.   आपल्या व्याख्यानात श्री.विश्वास पाटील यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा संपूर्ण जीवनपट विविध घटना, प्रसंग सांगत तसेच त्यांच्या कथा, कादंब-यांची कथानके रंजकतेने कथन करीत उलगडवला. अण्णाभाऊंच्या साहित्य वा-यावर मी वाढलो, त्यामुळे माझ्या श्वासात, अंगात, रक्तात अण्णाभाऊ रुजलेले आहेत असे सांगत अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाएवढे त्यांचे कौतुक आपल्याकडे झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.   स्त्री जीवनावर कादंबरी लिहिणारा पहिला साहित्यिक असा सन्मान करीत अण्णाभाऊंच्या 161 कथांपैकी 60 कथा या स्त्रियांच्या जीवनावर आधारित होत्या, त्यामुळे अण्णा भाऊ त्यांच्या कथांतील 42 मुलींचे घरंदाज बाप होते अशा शब्दात त्यांनी गौरव केला.           संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णा भाऊंचे अफाट महनीय कर्तृत्व वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून सांगताना सुप्रसिध्द अभिनेत्री नर्गिस आणि गीतकार शैलेन्द्र यांच्याशी असलेले अण्णा भाऊंचे ह्रदयस्थ नाते त्यांनी उलगडवले. शाळेत न जाताही जगभरातील वाचकांना भुरळ घालणारा अण्णा भाऊंसारखा साहित्यिक जगाच्या इतिहासात होणे नाही अशा शब्दात श्री.विश्वास पाटील यांनी अण्णा भाऊंना अभ्यासपूर्ण व्याख्यानातून आदरांजली अर्पण केली

000

 

संबंधित पोस्ट

इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करणार– उद्योगमंत्री उदय सामंत

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

 म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात

vishwatmaklokswamivarta

दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंबेडकर आणि मार्क्स : समाज परिवर्तनाच्या दिशा” या विषयावर संवाद सभा

vishwatmaklokswamivarta

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार