
गणेशोत्सव काळात विविध बाबींसाठी मनाई आदेश जारी
सांगली, प्रतिनिधी : गणेशोत्सव दि. 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. गणपती विसर्जन मिरवणुका, विविध आंदोलने या सर्व बाबींवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सार्वजनिक ठिकाणी, इत्यादींमध्ये रहदारीच्या विनियमन व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याच्या अधिकारान्वये पोटकलम (एन) मधील रस्त्यांमध्ये किंवा सार्वजनिक जागांमध्ये किंवा त्याच्याजवळ गायनवादन करणे, वाद्य, ढोल, ताशे किंवा इतर वाद्ये वाजविणे आणि शिंगे किंवा इतर कर्कश वाद्ये वाजविणे यासाठी लायसन देणे, त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा जवळपास राहणाऱ्या किंवा जवळून जाणाऱ्या लोकांस अडथळा, गैरसोय, त्रास, धोका, भय किंवा नुकसान पोहचू नये म्हणून मनाई केली आहे.
आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ पोटकलम (ओ) जमाव व रस्त्यातून किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुका यातील व्यक्तिंची वर्तणूक व वागणूक किंवा कृती यांचे विनियमन करणे व मिरवणुकांच्या बाबतीत त्यांनी ज्या मार्गानी, ज्या पध्दतीने व ज्यावेळी जावे ते मार्ग, ती पध्दत व त्या वेळा विहित करणे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३८ (१) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जवळपास किंवा जवळपासच्या मालमत्तेचा भोगवटा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिंना त्रास, अशांतता, अस्वस्थता किंवा नुकसान होऊ नये किंवा त्रास, अशांतता, अस्वस्थता किंवा नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून लेखी आदेश देऊन पुढील गोष्टींना आळा घालण्यासाठी मनाई करण्यासाठी, त्याचे नियंत्रण किंवा विनियमन करण्यासाठी त्यास योग्य वाटतील अशा सुचना दिल्या आहेत. यामध्ये कोणत्याही जागेत किंवा जागेवर कोणतेही गायन किंवा वाद्यसंगीत, कोणतेही वाद्य, साधन अगर पात्र किंवा जे आवाज किंवा (त्यास प्रतिध्वनी निर्माण करू शकेल) असे यंत्र वाजविल्यामुळे, बडविल्यामुळे आपटल्यामुळे किंवा फुकल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारे वापरल्यामुळे होणारा आवाज करणे किंवा चालू ठेवणे, किंवा कोणत्याही जागेत किंवा जागेवर, ज्याचा परिणाम आवाज होण्यात होतो किंवा त्यामुळे आवाज होतो, असा व्यापार, व्यवसाय किंवा काम चालवणे.
हा आदेश दि. 13 सप्टेंबर 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 27 सप्टेंबर 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. या कालावधीत संबंधित पोलीस ठाणे स्थलसीमेच्या हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने इत्यादी आयोजित करावयाची असल्यास, संबंधित पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, मिरवणूका इत्यादी बाबी ठरवून घेवून त्यास परवानगी घेणे बंधनकारक राहील.
या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास संबंधित महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 131 व 136 अन्वये कारवाईस पात्र राहील, असे आदेशात म्हटले आहे.
00000



