जालना मनपात तब्बल तेरा वर्षांनी शिक्षक दिन उत्साहात शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांच्या पुढाकारातून शिक्षकांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे सभागृह नेते महेशराव निकम यांचे आश्वासन
जालना मनपात तब्बल तेरा वर्षांनी शिक्षक दिन उत्साहात शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांच्या पुढाकारातून शिक्षकांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे सभागृह नेते महेशराव निकम यांचे आश्वासन
जालना (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिकेत तब्बल तेरा वर्षांनंतर शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) दुपारी चार वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित कार्यक्रमात महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापकांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षण-विद्युत सभापती सौ. भाग्यश्री जोगस यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षकांनी शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांची माहिती दिली. तसेच काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत महानगरपालिकेत तेरा वर्षांनंतर अशा उत्साहपूर्ण पद्धतीने शिक्षक दिन साजरा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांनी सभापती भाग्यश्री जोगस यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना भाग्यश्री जोगस म्हणाल्या की, शिक्षकांबद्दलचा आदर, कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा सभागृह नेते आणि गटनेते महेशराव निकम यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या कोणत्याही अडीअडचणीच्या काळात महानगरपालिका त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण उपायुक्त सुप्रिया चव्हाण यांनी केले. यावेळी महानगरपालिकेतील शिक्षक-शिक्षिका, मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.