
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी :आर्यन खान आज NCB समोर होणार हजर
मुंबई: प्रतिनिधी सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खान सध्या जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
त्यानुसार त्याला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. आर्यन खान ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. दोन ऑक्टोबरला एनसीबीने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा मारला होता.
यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळले होते. या प्रकरणात आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे सुद्धा तुरुंगात होते. आता तिघे जामिनावर बाहेर आहेत. अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार राहिली आहे.
जुही चावलाने मागच्या शुक्रवारी सेशन कोर्टात जाऊन १ लाख रुपयाच्या जामीन हमीपत्रावर म्हणजे बेल बाँडवर स्वाक्षरी केली. जुहीने आर्यनच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केली याचा अर्थ असा आहे की, आर्यन खान जर बेल बाँडची रक्कम भरु शकला नाही, तर त्याला सर्वस्वी कायदेशीररित्या जुही चावला जबाबदार असेल.



