
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना; सर्वोत्कृष्ट १० मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचा दि.१२ रोजी नवी दिल्लीत होणार सन्मान
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांमध्ये (Top 10) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा केंद्र शासनाच्या वतीने नवी दिल्ली येथे सोमवार दि.१२ रोजी सन्मान करण्यात येणार आहे. योजनेच्या मासिक प्रगतीचे निर्धारित प्रमुख कामगिरी निर्देशकांच्या आधारे मूल्यमापन करून जिल्ह्याची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली आहे
१०० जिल्ह्यांमधून निव
कृषी उत्पादकता, पीक तीव्रता तसेच कृषी कर्ज वितरणाच्या बाबतीत तुलनेने कमी कामगिरी असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या ११ विभागांच्या ३६ योजनांचे अभिसरण, राज्य शासनाच्या विविध योजना आणि खासगी क्षेत्राचा सहभाग यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
दि.१२ रोजी नवी दिल्लीत विशेष कार्यक्रम,योजनेच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोमवार दि.१२ रोजी सकाळी साडेअकरा वा. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्था( NASC) कॉम्प्लेक्समध्ये विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री तसेच संबंधित केंद्रीय मंत्रालये व विभागांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.मासिक प्रगतीच्या आधारे निवड
या कार्यक्रमात प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या डॅशबोर्डवर नोंदविण्यात आलेल्या मासिक प्रगतीच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी हे ही या सोहळ्यात उपस्थित असतील. तसेच गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट कार्यपद्धती व यशोगाथेचे सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या धन-धान्य कृषी योजनेतील जिल्ह्यांमधून प्रत्येकी चार प्रतिनिधींही (जिल्हाधिकारी, योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचा (KVK) एक शास्त्रज्ञ आणि एक नामनिर्देशित प्रगतिशील शेतकरी) या काय्रक्रमात सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया ,जिल्ह्याला मिळालेल्या या बहुमानाबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले की, ‘हा गौरव केवळ प्रशासनाचा नसून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी विभाग आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. भविष्यातही शेतकरी कल्याणासाठी व कृषी विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवून जिल्ह्याला देशात अग्रेसर ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’
०००००



