vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

देशी झाडांच्या वृक्षारोपणाव्दारे रबाळे नवी मुंबई येथे सेवा संकल्प अभियानाची उत्साहात सांगता

देशी झाडांच्या वृक्षारोपणाव्दारे रबाळे नवी मुंबई येथे सेवा संकल्प अभियानाची उत्साहात सांगता

 

      नवी  मुंबई प्रतिनिधी  – 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध सेवाभावी उपक्रम राबवित नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानाची सांगता आज विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून झाली. त्यामध्ये रबाळे येथील डोंगराळ भागात देशी वृक्षरोपांच्या लागवडीचा पर्यावरणशील उपक्रम सर्व वयोगटातील नागरिकांच्या उत्साही उपस्थितीत संपन्न झाला.

          याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सदस्य श्रीम.रंजना सोनवणे, नगरसेवक तथा माजी महापौर श्री.सुधाकर सोनवणे, वृक्षप्राधिकरण सदस्य श्री.ज्ञानेश्वर नाईक व श्री.विनोद म्हात्रे, माजी नगरसेविका डॉ.गौतमी सोनवणे तसेच उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, शासनाच्या वन विभागाचे सहा. वनसंरक्षक श्री.सोनल वळवी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री.नरेंद्र मुठे, वन अधिकारी श्री.प्रवीण आव्हाड, विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री.संजय तडवी आणि उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

          सेवा संकल्प अभियान महिन्याभराच्या कालावधीत आपण राबविले असले तरी हे सेवाकार्य पुढेही निरंतर सुरू ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द असल्याचे सांगत या माध्यमातून सामाजिक दायित्व जपण्याचा निर्धार यावेळी बोलताना उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी व्यक्त केला. श्री.सुधाकर सोनवणे यांनी या भागात 5 हजाराहून अधिक वृक्ष लावून व वाढवून हाती घेतलेले हे वनीकरणाचे काम प्रशंसनीय व अनुकरण करण्याजोगे असून ते खरे श्रीमंत असल्याचे उपमहापौर म्हणाले.

          शासनाचे सहा. वनसंरक्षक श्री. सोनल वळवी यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा या जागेवर आलो होतो, तेव्हाची परिस्थिती आणि आज वृक्षारोपणामुळे कायापालट झालेली ही जागा पाहिल्यावर अचंबित झाल्याचे सांगत श्री.सुधाकर सोनवणे यांनी लोकसहभागातून उभे केलेले हे वनीकरणाचे कार्य कृतीतून परिवर्तन घडू शकते याचे मूर्तींमत उदाहरण असल्याचे सांगितले.

          याप्रसंगी बोलताना नगरसेवक श्री.सुधाकर सोनवणे यांनी 2005 पासून या भागात सुरू झालेल्या या 5 हजारहून अधिक वृक्षांच्या वनीकरण प्रवासाकडे आज मागे वळून बघताना समाधान वाटते व अजून बरेच काही करण्याचे बाकी आहे ही प्रेरणा मिळते असे सांगत ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाचे संकट पाहता पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येकाने स्व-जबाबदारी म्हणून ती स्वीकारली पाहिजे, हे जाणूनच ही अखंड लोकचळवळ उभी केल्याचे अधोरेखित केले.

          ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमार्फत नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्या संबंधित घटकांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर कांशीराम विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल विशे व मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाल आणि सर्व सहकारी शिक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.अपर्णा मालवणकर, डॉ.मोहिनी केणी व त्यांचे सहकारी, घणसोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.संजय तडवी व सहकारी, प्रशासकीय अधिकारी श्री.वसंत मुंडावरे, अंगणवाडी सेविका श्रीम.वंदना साबळे, उद्यान अधिकारी श्री.दिपक रोहेकर, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका यांना उत्तम कामगिरीबद्दल सन्मानीत करण्यात आले.

           तसेच मॅजिक बस, विश्व बाल केंद्र, स्त्री मुक्ती संघटना / परिसर सखी, अहोमा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यवर्धिनी अशा सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.

          यावेळी विविध सेवाभावी संस्थांमार्फत मांडण्यात आलेल्या प्रदर्शनी स्टॉल्सना भेटी देऊन मान्यवरांनी व उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सेवा संकल्प अभियानाची सांगता झालेली असली तरी हा सेवाभावाचा वसा नियमित जपण्याचा तसेच नवी मुंबईत हिरवाई फुलवण्याचा आणि निसर्ग संवर्धनाची परंपरा निरंतर व अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पाणीटंचाई व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत

ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामास मंजुरी

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू