
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज, CBI ताब्यात घेणार?
मुंबई प्रतिनिधी
शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात काल विशेष सीबीआय कोर्टानं सचिन वाझेसह तिघांना सीबीआयची कोठडी सुनावली होती. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील सीबीआयची कोठडी मिळण्याची शक्यता होती. पण त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जे जे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, यशस्वी उपचारांनंतर त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला
एएनआयच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना शनिवारी खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयातील ऑर्थोपिडिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी यशस्वी उपचारांनंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. १ एप्रिल रोजी सीबीआयनं देशमुख यांची कोठडी घेतली होती. त्यांना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीनं खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती.
दरम्यान, शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टानं संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांना सात दिवसांची अर्थात ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयनं कोर्टानं सुनावणीदरम्यान या तिघांसाठी १० दिवसांची कोठडी मागितली होती. या प्रकरणात यापूर्वी ईडीनं अनिल देशमुख यांच्यासह संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली होती तर एनआयएनं सचिन वाझे यांनी अटक केली. पलांडे आणि शिंदे हे अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी आहेत.



