
देशात आयुर्वेदिक आहारावर आता कडक निर्बंध; केंद्राचा मोठा निर्णय…
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आयुष मंत्रालयाच्या आय़ुर्वेदिक आहार गटातल्या उत्पादनांसाठीची नियमावली जारी केली आहे. त्यामुळे आता आयुर्वेदिक आहार विक्रेता आणि निर्मात्यांना आय़ुर्वेदिक औषधं या गटात विक्री करता येणार नाही. त्यासाठी खाद्य सुरक्षा विभागाक़डून परवाना घेणं आवश्यक असेल. नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
आय़ुर्वेदिक आहार या गटातल्या उत्पादनांची निर्मिती आणि वितरण अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम, २०२२ च्या नियमांनुसार केली जाईल आणि FSSAI च्या परवानगीनंतरच विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होईल. आयुर्वेद आहार श्रेणीसाठी एक वेगळा लोगोसुद्धा तयार करण्यात आला आहे. यामुळे या प्रकारातल्या उत्पादनांना ओळखणं सोपं होईल आणि त्यांचा दर्जा योग्य राखण्यातही फायदा होईल. त्याचबरोबर आयुर्वेदाच्या अधिकृत पुस्तकांमध्ये लिहिलेल्या पाककृतीनुसार तयार करण्यात आलेल्या पदार्थांनाच मान्यता दिली जाणार आहे. आयुर्वेदिक आहाराच्या अनेक पदार्थांमध्ये खाद्य सुरक्षा मानकांचं पालन सध्या केलं जात नाही. कोरोना महामारीनंतर देशात अनेक ठिकाणी आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली आयुर्वेदिक आहार उत्पादनांची विक्री विनापरवाना होत होती. यामध्ये देशी, विदेशी अशा हजारो कंपन्या आयुर्वेदिक उत्पादनं तयार करत होत्या. त्यामुळे बाजारात आयुर्वेदिक आहार उत्पादनांचं प्रमाण वाढलं होतं.



