
न्यायमूर्ती ललित बनणार देशाचे नवे सरन्यायाधीश; रमना यांनी केंद्राकडं पाठवली शिफारस…
दिल्ली प्रतिनिधीन्यायमूर्ती यू यू ललित हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश रमना यांनी न्यायमूर्ती ललित यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडं पाठवलीय. नियमानुसार, निवृत्त होणारे CJI नवीन CJI च्या नावाची शिफारस करतात. CJI रमना 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.
न्यायमूर्ती ललित मुस्लिमांमधील ‘तिहेरी तलाक’ प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांचा भाग आहेत. बार असोसिएशनमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती होणारे ते दुसरे सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती एस. एम. सिक्री हे मार्च 1964 मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती झालेले पहिले वकील होते. जानेवारी 1971 मध्ये ते 13 वे सरन्यायाधीश झाले.
न्यायमूर्ती ललित हे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना 27 ऑगस्ट रोजी निवृत्त झाल्यानंतर, ते भारताचे 49 वे CJI बनणार आहेत. न्यायमूर्ती ललित यांची 13 ऑगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा ते प्रसिद्ध वकील होते. न्यायमूर्ती ललित तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं ऑगस्ट 2017 मध्ये 3-2 अशा बहुमतानं ‘तिहेरी तलाक’ असंवैधानिक घोषित केला होता. त्या तीन न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती ललित यांचाही समावेश होता.



