
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत भविष्यात होणाऱ्या निवडणुकीबाबत रणनितीवर चर्चा झाली…
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हजेरी लावली. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या निवडणुकीबाबत रणनितीवर चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले. रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ आणि मराठवाडा प्रांतची बैठक पार पडली. या बैठकीच्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या उपस्थिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्याशिवाय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय सहसंघटन प्रमुख शिव प्रकाश देखील बैठकीला उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होते. यावर्षी ही बैठक १० ते १२ सप्टेंबरदरम्यान छत्तीसगडमधील रायपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय समन्वय बैठकीपूर्वी सरसंघचालक आणि सरकार्यवाह देशातील सर्व क्षेत्रांच्या बैठकीत घेतात. देशात संघाची १२ क्षेत्रे आहे. त्यापैकी ६ बैठकी सरसंघचालक आणि उर्वरित सरकार्यवाह घेत असतात. त्यानुसार सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे पश्चिम क्षेत्राची समन्वय बैठक नागपुरात घेत आहेत. या बैठकीत विदर्भ आणि देवगिरी (मराठवाडा) प्रांतातील संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रांत व क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकारण वेगाने बदलत आहेत. नवीन आघाड्या आकारास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर संघाच्या या बैठकीला महत्वाचे मानले जात आहे.शासन, संघटनेतील समन्वयावर भरराज्यात सरकार आल्यामुळे शासन आणि संघटना यांच्यातील समन्वय, संघटनात्मक व शासकीय पातळीवरील बदल आणि भविष्यातील निवडणूक रणनीती यावर चर्चा करण्यात झाल्याचे समजते. मात्र, यासंदर्भात पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.



