
“आधी बेशरमपणा करायचा आणि नंतर…” आदित्य ठाकरेंचा छत्रपतींसोबतचा फोटो पाहून अतुल भातखळकरांचा संतापछत्रपती शिवाजी महाराजांसोबत आदित्य ठाकरेंची तुलना करणारा फोटो व्हायरल झाल्यानंतर अतुल भातखळकरांनी संताप व्यक्त केला आहे
मुंबई प्रतिनिधी
युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी अलीकडेच शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला होता. या फोटोमध्ये आदित्य ठाकरेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली होती. ‘रयतेचा राजा शिवबा माझा’ असंही संबंधित फोटोवर लिहिण्यात आलं होतं. या फोटोवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर राहुल कनाल यांनी संबंधित फोटो डिलीट केला आहे. तसेच अन्य एक ट्वीट करत माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनालविरुद्ध आपण पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल कनाल यांच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर करत हा संताप व्यक्त केला आहे.



