
|| #श्री_शिवलिलामृत || मराठी अर्थ || अध्याय सातवा ||सुमेधा आणि सोमवंत, मदन आणि पिंगला, सुमती आणि भद्रायू
श्रीगणेशाय नमः । हे पार्वतीपते । तुझा जयजयकार असो. तुझ्या भाळी अग्नियुक्त तृतीय नेत्र आहे. तू आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण करतोस. तुझ्या अंगावरील सर्पाची भूषणे खूप शोभून दिसतात. तू कोट्यवधी सूर्यांसमान तेजःपुंज आहेस. तू विश्वव्यापक आहेस, विश्वाचा स्वामी आहेस, सर्व भूतांचा अधिपती आहेस. तू अनंत आहेस, अमूर्त आहेस तसा मूर्तिमानही आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. तू परमानंदस्वरूप आहेस, परात्पर, पंचमुख, पंधरा तू नेत्र असलेला (प्रत्येक मुखास तीन नेत्र याप्रमाणे) परम-पावन, परम-मंगल व अत्यंत शुभ्र वर्णाचा आहेस. तू सनातन परब्रह्म आहेस, अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. हे शंभू महादेवा ! सहाव्या अध्यायात तू श्रीधराकडून आपले गुणवर्णन करविलेस. अत्यंत पवित्र असे सीमंतिनी आख्यान वदविलेस. व्यासांनी निर्मिलेल्या पुराणकथा सूताच्या मुखाने तूच श्रोत्यांना ऐकवितोस. तुझी लीला अगाध आहे. मी तुला नमस्कार करतो !
ही स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला. त्याने आणखी एक कथा सांगण्याची प्रेरणा दिली. ती माहात्म्यकथा अशी आहे –
सुमेधा आणि सोमवंत ह्यांची कथा
विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. त्याला सुमेधा नावाचा एक गुणवान पुत्र होता. वेदमित्राला एक मित्र होता. त्याचे नाव सारस्वत. तो वेदशास्त्रसंपन्न होता. सोमवंत हा त्याचा पुत्र. सुमेधा आणि सारस्वत हेही जीवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथांचे चांगले अध्ययन केले होते. त्यांना पुराणग्रंथही मुखोद्गत होते. ते सोळा वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, “मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्राह्मणांना अपेक्षित असणारी सर्व विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे. आता राजाची भेट घेऊन त्याला आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवा. त्याच्याकडून धन मिळवा. मग आम्ही योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ.’
पितृआज्ञेने ते दोघे ब्राह्मणकुमार राजाला भेटले. त्याच्या सन्मुख त्यांनी आपले विद्यावैभव प्रकट केले. त्यांचे ज्ञान पाहून राजा प्रसन्न झाला. पण पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरविले. तो त्यांना म्हणाला, “मुलांनो! मी तुम्हांला एक काम सांगणार आहे. ते तुम्ही कशा प्रकारे करता त्यावरून तुमचे कौशल्य सिद्ध होईल. हे तुम्हांला मान्य आहे का ?” राजाच्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला.. तेव्हा राजा म्हणाला, “चित्रांगद हा नैषध नगरीचा राजा आहे. सीमंतिनी ही त्याची पत्नी साध्वी असून शंकराची परमभक्त आहे. ती शिवपार्वतीप्रीत्यर्थ दांपत्यांची पूजा करते. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे आणि ब्राह्मण दांपत्य म्हणून तुम्ही दोघांनी तिच्याकडे जावे. ती तुमचा उत्तम सन्मान करील. तेथून परत आल्यावर तिने दिलेली वस्त्राभूषणे तुम्ही मला दाखवा, म्हणजे तुम्ही खरोखरच विद्वान आणि चतुर आहात हे सिद्ध होईल. मग मीही तुम्हांला भरपूर द्रव्य देईन. माता, पिता, गुरू आणि राजा यांचे वचन कधी मोडू नये असे म्हणतात.”
ते ऐकून दोघे विप्रकुमार विचारात पडले. ते राजाला म्हणाले, “महाराज, हे तर मोठेच निंद्य कर्म आहे. स्त्रीवेषधारी पुरुष पाहताच सचैल स्नान करावे असे शास्त्र सांगते अन्यथा स्त्रीवेष धारण करणारा आणि त्याला पाहणारा अशा दोघांचेही अधःपतन होते. स्त्रीवेषधारी पुरुष या अनुचित कर्मामुळे जन्मोजन्मी स्त्रीच होतो. हे कुकर्म आम्ही कधीच करणार नाही. आम्ही विद्यावंत आहोत. आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. लोक ज्ञानी ब्राह्मणांचा सन्मान करतात. त्यांना वंदन करून प्रार्थनापूर्वक धन देतात… विद्या ही पंडितांची माता! साक्षात कामधेनू ! संकटात साह्यकर्ती । प्रवासात रक्षणकर्ती ! ती मातापित्यांहून वेगळी आहे. विद्वत्ता पाहून राजे- महाराजेही नतमस्तक होतात. विद्याहीन मनुष्य म्हणजे दगड | जिवंत असूनही मृतवत ! अशा मूर्खाचे तोंडसुद्धा पाहू नये ! अशा मूढाला जन्म दिला म्हणून माताही दुःख करते.”
राजा म्हणाला, “मुलांनो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही स्वतःची विद्वत्ता सिद्ध केलीच आहे. आता तुम्ही वेषांतराचे नाटक किती हुबेहूब वठविता तेच मला पाहायचे आहे.” राजाने खूपच आग्रह केला तेव्हा कोठे ते कबूल झाले. मग राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेष दिला. सुमेधा आणि स्त्रीवेषधारी सोमवंत प्रवासास निघाले. सोमवारी सायंकाळी सीमंतिनीचे शिवपूजन चालले असताना ते ब्राह्मणदांपत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती. हे दोघे पुरुषच आहेत हे तिच्या चाणाक्ष दृष्टिने तत्काळ ओळखले. पण तसे जराही भासवू न देता त्या शिवभक्त पतिव्रतेने त्या दांपत्याची शंकर आणि पार्वती समजून पूजा केली. त्यांना षड्रस अन्नाचे भोजन दिले. अपार द्रव्यदक्षिणा, वस्त्रे व अलंकार देऊन त्यांना सन्मानाने निरोप दिला….
सुमेधा आणि सोमवंत ह्यांनी राजाची अट पूर्ण केली होती. नैषधात आल्यामुळे त्यांना चांगलाच धनलाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते आनंदाने मार्गक्रमण करीत होते. अरण्यमार्गाने जाताना पुढे सुमेधा व मागे सोमवंत चालत होता. सीमंतिनीने पूजन केल्यानंतर सोमवंताचे शरीर श्रीदेहासारखे झाले होते. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. ती सुमेधाशी प्रणयोत्सुक संवाद करू लागली, म्हणाली,
“प्राणनाथा, या वनातील वातावरण किती रम्य आहे ! प्रेमी युगुलांना आवडेल असे ! या संधीचा लाभ घे. मी कामरूपी अग्नीने अगदी व्याकूळ झाले आहे. तरी सहवास करून माझे अंगप्रत्यंग शांत कर.” ते ऐकून सुमेधाला मोठे आश्चर्य वाटले. सीमंतिनीच्या तपोबलामुळे सोमवंताला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे याची सुमेधाला कोठून कल्पना असणार ? म्हणून तिच्या डोळ्यांतील कामूक भाव व तिची कामपूर्तीची याचना ऐकून तो सर्दच झाला, सोमवंताला म्हणाला, “मित्रा, थट्टा नको, आपले नाटक पूर्ण झाले आहे. आता हा स्त्रीवेष टाकून दे बरं!” पण स्त्री ● झालेला सोमवंत ऐकेचना. तिने अनिवार कामवासनेने जमिनीवर अंग टाकले आणि “ये प्राणनाथा ये. माझा कामाग्नी शांत कर.” असे म्हणून त्याला ओढू लागली. सुमेधाला स्त्रीवेषधारी सोमवंताचे हे वर्तन अपेक्षितच नव्हते. त्याने सोमवंताला झिडकारले, म्हणाला, “भलते • सलते बरळू नकोस! कोणी ऐकले तर लोक काय म्हणतील. तू आणि मी गुरुबंधू आहोत. ब्रह्मचारी आहोत.” तेव्हा स्त्री झालेला सोमवंत “गुरुबंधू होतो. आता नाही. माझे अवयव पाहा. माझे पुरुषत्व जाऊन मी स्त्रीरूप झालो आहे. तू माझी कामेच्छा पूर्ण कर.” सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर ठाकले आहे हे त्याच्या लक्षात आले. ती स्त्री त्याची चुंबने घेऊन एकसारखी त्याच्या अंगलट येत होती, निर्लज्ज वर्तन करीत होती, पण तो बधला नाही.. म्हणाला,
अरण्यातील एकांत, आजूबाजूला कोणीही नाही, बरोबर सघन घराण्यातील तरुण सुस्वरूप स्त्री, तीही कामप्रेरीत होऊन सर्वस्व अर्पण करण्यास तयार झालेली, अशा प्रकारे सर्व अनुकूलता असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय ! तो साक्षात शंकरच ! सर्व तीर्थे त्याच्या सन्मुख विनम्र होतात. जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही, विद्वान पंडित असूनही ज्याला जराही गर्व नाही, लोकांनी कटू वचनांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष ऐकून वा पाहूनही जो त्याची अन्यत्र कधीच वाच्यता करीत नाही, तो नर शंकरस्वरूपच जाणावा. जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करीत नाही, जो चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्मे आणि सत्कृत्ये लोकांमध्ये सांगत नाही, जो पंडित आणि मूर्ख यांत भेद करून एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करीत नाही, जो सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात आपपर भावाला जराही थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही, तो शिवस्वरूपच होय. जो आपल्या अभ्यासाचा टेंभा मिरवीत नाही, लोकांनी आपले शिष्यत्व पत्करावे असे ज्याच्या मनातही येत नाही, ज्याच्या सर्व चित्तवृत्ती विरून गेल्या आहेत, जो एकांतप्रिय आहे, भ्रांती नष्ट झाल्यामुळे जो अखंड समाधीत असतो, जो सर्वस्व गेले तरी खंत करीत नाही तो शिवस्वरूपच होय. कवी श्रीधर म्हणतो- “असे पुरुष म्हणजे साक्षात ब्रह्मानंदच! त्या परमहंसाच्या पायातील पादुका होऊन राहावे.” सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने त्याही परिस्थितीत धैर्य बाळगले. स्त्रीरूप झालेल्या सोमवंताला अनेक प्रकारे नीट समजावले. “आधी आपण गावी जाऊ आणि मगच काय तो विचार करू. असे सांगून त्या ‘स्त्री’ला घरी आणले. ‘सारस्वत’ ब्राह्मणाला बोलावून सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला. ते ऐकून त्या पित्याला मोठा धक्का बसला. तो छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला, म्हणाला, “अरे दुर्जना ! हे तू काय केलेस ? माझ्या मुलाला अनुचित कर्मास प्रवृत्त करून तुला कोणते असुरी समाधान मिळाले ? तुझी बुद्धी अशी कशी चळली? माझा एकुलता एक मुलगा, तोही वेदशास्त्रसंपन्न, पण तू त्याचा घात केलास. तुझ्यामुळे माझा निर्वंश झाला ! हीसुद्धा ब्रह्महत्याच! या कृत्याने तुझी दुष्कीर्ती होवो! तुझे तोंड काळे होवो ! तुला जगासमोर येण्याची लाज वाटो !”
यावर राजा काय बोलणार ? त्याने लज्जेने मान खाली घातली. आपण सीमंतिनीची उगाच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चात्ताप वाटू लागला. खोटे वेषांतर केलेल्या पुरुषाचे खऱ्या स्त्रीमध्ये कसे रूपांतर झाले ? याचेच त्याला मोठे कोडे पडले. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व म्हणाला, “मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही काहीही करा कोणतेही प्रखर अनुष्ठान करा पण या सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या.” तेव्हा ब्राह्मण म्हणाले, “राजा, आम्हांला क्षमा कर. याबाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. ही तर ईश्वराची लीला आहे. ती कोणी व कशी बदलावी ?” तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सात दिवस निराहार राहून अनुष्ठान केले. तिच्या प्रीत्यर्थ मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. राजा म्हणाला, “माते, माझ्यावर कृपा कर. सोमवंत नावाच्या विप्रपुत्राला माझ्या आगळिकीमुळे स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. त्याला पुन्हा पुरुष कर.”
देवी म्हणाली, “ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतिनी महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. तिच्यापुढे माझे कर्तृत्वही थीटेच! आता मी सांगते ते ऐक. त्याला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दांपत्यास दैवी गुण असलेला एक वेदज्ञ पुत्र होईल.
देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले. त्यांना देवीचा संदेश सांगितला त्यांची क्षमा मागून त्यांचे मन वळविले. सुमेधाचा ‘सोमवंतीशी’ विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी ! धन्य तिची शिवभक्ती ! तिला तिन्ही जगात उपमा नाही. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही.
वेश्या होती. हा दुराचारी मदन तिच्या नादी लागला होता. सदान्कदा तिच्याकडेच पडलेला असे. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा, मातापित्यांचा त्याग केला. तो ब्रह्मकर्मेही करीत नसे. त्याला लोकलज्जेची चाड उरली नव्हती. तो मद्यमांस सेवन करी. अहोरात्र त्या वेश्येशी विलास करीत असे.
त्या काळी ऋषभ नावाचा एक महान योगी लोकांच्या उद्धारासाठी भूलोकी संचार करीत होता. तो दीनदुबळ्यांची दुःखे, संकटे निवारण करीत असे. एके दिवशी भिक्षा मागत हिंडत असताना तो अकस्मात पिंगलेच्या द्वारी आला. त्या शिवयोग्याला पाहून पिंगला आणि मदन तत्परतेने सन्मुख गेले. त्याला सन्मानाने घरात आणले. त्याची षोडशोपचारे पूजा केली. उत्तम पक्वान्नांचे भोजन आणि वस्त्रालंकार देऊन त्यास संतुष्ट केले. त्याला उत्तम शय्येवर निजवले. त्याला विश्रांती मिळावी म्हणून रात्रभर जागरण करून त्याचे पाय चेपले, त्याला वारा घातला. सूर्योदयाच्या सुमारास तो शिवयोगी एकदम अदृश्य झाला. याचे त्या दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या रूपाने प्रत्यक्ष शंकरानेच आपल्याला दर्शन दिले, आपली सेवा घेतली म्हणून त्यांना मोठे समाधान वाटले.
कालांतराने पिंगला आणि मदन मरण पावली. पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याची अल्प सेवा घडल्यामुळे त्या दोघांना पुन्हा मनुष्यजन्म मिळाला. मदनाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. पिंगलेचा सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म झाला. तिचे नाव ‘कीर्तिमालिनी’ ठेवण्यात आले.
सुमती आणि भद्रायू ह्यांची कथा
इकडे सुमती गरोदर असताना तिच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. दाशार्ह राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्या सुमतीचा द्वेष करायच्या. सुमतीला पुत्र झाला तर पुढे तोच राज्याधिकारी होणार म्हणून त्या सवतींनी तिचा काटा काढायचे ठरविले. अन्नातून तिच्यावर विषप्रयोग केला. ती मरणारच होती पण नशिबाने वाचली. तरी विषाने आपले कर्तृत्व दाखविलेच ! तिला रोग झाला. विष अंगावर फुटून तिला ठायी ठायी जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. त्याच्याही अंगावर फोड होते. त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्य बोलावले. त्या दोघांवर खूप औषधोपचार केले. पण उपयोग झाला नाही. सुमती मोठ्या धैर्याने व्यथा सोसत होती. पण बाळाचे काय ? तो रात्रंदिवस रडत राही. त्या दोघांना मरण येत नव्हते आणि त्यांची व्याधीही बरी होत नव्हती. त्यांच्या चिंतेने राजाला अहोरात्र चैन पडत नसे. झोपही येत नसे. शेवटी तो कंटाळला. त्याने एक कटू निर्णय घेतला. राणीला आणि मुलाला रथात घालून घोर निर्जन अरण्यात सोडून दिले.
व्याधिग्रस्त सुमती आपल्या बाळाला कडेवर घेऊन श्वापदांनी भरलेल्या त्या अरण्यातून मार्ग काढत हिंदू लागली. देहाला दुःख होतेच आता अंतःकरणही दुखावले होते. तिच्या पायांना दगड बोचत, काटे रूतत, अंग असह्य वेदनांनी ठणके. ती आक्रोश करायची, रडायची. कधी शुद्ध हरपून कोसळायची. तहानेने व्याकूळ व्हायची. तेथे तिचे अश्रू पुसणारे, तिच्या वेदनेवर सांत्वनपर शब्दांची फुंकर घालणारेही कोणी नव्हते.
सुमती शंकराचा धावा करायची, म्हणायची, “हे शंभू महादेवा! तुला माझी दया कशी येत नाही ? तू जगाचा आत्मा आहेस ना ! भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती! मग माझी उपेक्षा का करतोस ? हे कैलासपती ! तू जगाला वंद्य आहेस, मूर्तिमंत ब्रह्मांनद आहेस, वेदशास्त्रे, तुझे अखंड गुणगान करतात. हे त्रिनेत्रा ! हे पंचवदना ! तू त्रिदोषांचे निवारण करणारा, जगाचे आदिस्वरूप, अजन्मा, अजित आणि धवल वर्णाचा आहेस. तू माझा उद्धार कर. मला जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून सोडब. तू अनादिसिद्ध आहेस, कोणालाही तुझा थांग लागत नाही. तू गुणातीत आहेस, सद्गुणांचे वैभव आहेस. तूच हे मायारूपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या हे जगद्गुरो ! मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये. मला मार्ग दाखव.”
रामाने टाकलेल्या सीतेप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे सुमतीची अवस्था झाली होती. एके काळी महान ऐश्वर्य भोगणारी ती पट्टराणी आज भयंकर हालअपेष्टा सोसत होती. बनात बाघसिंहांच्या गर्जना ऐकून ती मूर्च्छित पडायची. तिचे करुण रुदन ऐकून पशुपक्षीही रडायचे. पक्षी आपले पंख पसरून तिच्यावर सावली धरायचे, चोचीतून पाणी आणून बाळावर शिंपडायचे, मध आणि फळांचे मधुर रस त्याच्या तोंडात घालायचे. वनगायी शेपटीने वारा घालायच्या. त्या सर्वांचे ते प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. असो.
अशा प्रकारे ती राजपत्नी असाहाय्य, दीन अवस्थेत रानीवनी हिंडत असताना काय घडले ते ऐका. गावोगावी माल विकणारा एक वाणी बैलांवर सामान लादून आपल्या सेवकांसह एक दिवशी अरण्यमार्गाने ‘जात होता. त्याचे लक्ष सुमतीकडे गेले. त्याने तिला व तिच्या मुलाला आपल्या बरोबर घेतले. प्रवास करीत तो वाणी वैश्य लोकांचीच वस्ती असलेल्या वैश्यनगरास आला. पद्माकर नावाचा एक श्रीमंत शेठ तेथील अधिपती होता. तो मोठ्या मनाचा, भाग्यवान, नाना वस्तूंचा संग्रह करणारा आणि गुणग्राहक असा होता. त्याने आपुलकीने सुमतीची चौकशी केली. तिचे पूर्ववृत्त जाणून घेतल्यावर त्यालाही खूप वाईट वाटले. तो रडू लागला. एक दीर्घ निःश्वास टाकून तिला म्हणाला, “मुली,
आजपासून तू माझी धर्मकन्या आहेस. तुझ्यासारखा दुर्धर प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. असो. आता काळजी करू नकोस. यापुढे तू येथेच राहायचे. मी तुला जवळच एक घर घेऊन देतो.”
पद्माकर वैश्याने सुमतीला व तिच्या मुलाला आश्रय दिला. तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्या मायलेकरांना बरे वाटावे म्हणून वैद्यांकरवी अनेक उपायउपचार केले. पण उपयोग झाला नाही. तेव्हा सुमती म्हणाली, “तात, आता शंकरच माझा वैद्य ! त्याची कृपा झाली तरच आमचा रोग बरा होईल.” तिची निराशा तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होती. असेच काही दिवस लोटले. एके रात्री तो मुलगा मरण पावला. सुमतीच्या जगण्याला तो मुलगाच एकमात्र दिलासा होता. दैवाने तोही हिरावून घेतला! तिच्या शोकाला पारावार उरला नाही. पद्माकर तिची समजूत काढू लागला. लोक जमले. तेही तिचे सांत्वन करू लागले. रात्र सरली. सकाळ झाली. मंडळी अंत्यविधीच्या तयारीस लागली. तेव्हा योगायोगाने ऋषभ नावाच्या एका थोर शिवयोग्याचे तेथे आगमन झाले.
ऋषभाचा सुमतीला विरक्तीपर उपदेश
त्याला पाहून सुमतीला मोठा धीर आला. या तपस्व्याने कृपा केली तर आपला पुत्र जिवंत होईल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली. त्याही प्रसंगी पद्माकराने त्याचे स्वागत केले. त्याची पूजा केली. सुमतीनेही त्याला वंदन केले. तेव्हा तो म्हणाला, “सुमती ! रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस ? तुझे पूर्वजन्मीचे मातापिता, आप्त, पती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत, सांगशील ? चौऱ्याऐशी लक्ष योनी फिरत आलीस, तेथील तुझे सगेसोयरे कोठून आले ? कोठे गेले? तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधी तरी विचार केला आहेस का ? पूर्वीच्या आप्तस्वकीयाचे तुला दुःख वाटत नाही आणि आता पुत्र गेला म्हणून विलाप करतेस ? लोक ज्या जातीत, ज्या कुळात ज्या वर्णात शरीर धारण करतात, त्या जातिवर्णाच्या अभिमानाने नाचतात, पण मुळात आपण कोठून आलो याचा जराही शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तू हा पुत्र कोठून आणलास ? तो मेल्यावर कोठे गेला ? तू आणि जमलेले हे सर्व लोक पुढे कोणत्या योनीत जाणार आहात ? काही सांगशील? आत्मा हाच अमर आहे. नित्य व शाश्वत आहे. तो कोणाचा बंधू नाही. तो कोणाचा पुत्र नाही.. शरीर क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. ज्या शरीरासाठी तू शोक करीत आहेस ते तर प्रेतरूपाने तुझ्या समोरच पडले आहे ! अगं, पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात, मृगजळही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीरही मिथ्याच ! चैतन्य अडून तयार झालेली एक लाट! तिचा शोक कशासाठी करायचा ? चित्रातील वृक्षाच्या सावलीत कोणी जाऊन बसले, चित्रातील अग्नीने घर जाळले, चित्रातील पाण्याच्या प्रवाहातून कोणीतरी वाहून नेले, वंध्येच्या मुलाने द्रव्य कमवून आणले, भीष्माच्या कन्येचे हनुमंताशी लग्न झाले, वाऱ्याचा मंडप बाळूच्या दोराने घट्ट उभारला, शिंपीत भासणारे रूपे पात्रात जमवून त्याने आकाशपुष्प सजविले, कासवीच्या दुधाचे तूप मिळवून मृगजळातील माशांनी दीप प्रज्वलित केला, आणि पायांत चाळ बांधून नाचत असलेले जन्मांधांनी ते डोळे भरून पाहिले, चित्रातील चोरांनी सापाच्या कानांतली कुंडले चोरून नेली हे कधीतरी शक्य आहे का ?
हे जसे मिथ्या, तसा प्रपंचही मिथ्या आहे. त्याला खरे कसे मानावे? आता जे मुळातच अशाश्वत आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थच नाही काय ? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. हे सर्व रोगांचे भांडार ! कृमिकीटकांचे माहेरघर! पापाचा समुद्र ! भ्रांतीचे अथांग आकाश ! रक्त, मांस, श्लेष्मा, नसा व अस्थींची एकत्र बांधलेली चर्मवेष्टित मोळीच! मातेचा विटाळ व पित्याचे रेत याचे संमिश्रण! मुळातच अपवित्र! ते गोमूत्र शिंपडून वा डोक्याचे मुंडण करून पवित्र कसे होणार? मुली, गुरूला शरण गेले नाहीत तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? कल्पान्तापर्यंत कोट्यवधी फेरे घेतले, तरी ते मुक्त होणार नाहीत. सुमती, तुझे जन्मोजन्मीचे पती कोठे आहेत ते तू सांगू शकत नाहीस. म्हणूनच म्हणतो हा सगळा मायेचा पूर आहे हे तू लक्षात घे. वेळीच सावध हो ! त्रिगुणरूपी बांधकामसाहित्य आणि पंचमहाभूतांचे वासे जोडून तयार केलेल्या या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस… याला केव्हा अग्नी लागेल याचा भरवसा नाही. देह म्हणजे मृगजळ ! देह म्हणजे स्वप्नसृष्टीतील साम्राज्य ! तरीही प्राणी धन, धान्य, पुत्रादिकांची इच्छा धरतात, याला काय म्हणावे ? गंगेमध्ये दोन काष्ठांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती बिलग व्हावे, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी ! पतिपत्नीचे प्रपंचातील सहजीवन अगदी तसेच असते. जेवढा ऋणानुबंध तेवढाच सहवास ! कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात, थोडा वेळ विसावतात, आणि दुसऱ्या झाडावर निघून जातात. अपत्ये त्या पाखरांसारखीच असतात. ऊन लागते म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत असतो, ऊन सरले की निघून जातो. सगेसोयरेही तसेच असतात. हा खेळ सतत चालूच असतो. आल्यागेल्या पाखरांची व पांथस्थांची चिंता वृक्ष करतो का ? नाही ना ! मग आपण तरी दुःख का करावे? आणि गेलेल्यांबद्दल शोक करून हाती काही लागतही नाही. अर्थात प्रपंच हा नुसता खेळ आहे! सत्य नव्हे ! आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान! हीच माया ! हीच प्रपंचभ्रांती ! या मायामय प्रपचवृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्वसाक्षी आहे. नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. तो सर्व काळ अलिप्त असतो. जीवाचा स्वभावच वेगळा! तो विषयरूप फळे खातो. ती भक्षण केल्याने त्याला स्वतःचाच विसर पडतो. आपण वास्तविक कोण आहोत ? आपले स्वरूप कसे आहे? हे त्याला कळतच नाही. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निजस्वरूप दाखवितो. मग तो स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो !”
शिवयोगी ऋषभाच्या मुखातून ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर आणि सुमतीला धन्य-धन्य वाटले. अष्टसात्त्विक भावांनी त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. सुमतीने धावत जाऊन त्याचे पाय धरले व म्हणाली, “हे योगेश्वरा, तुझे ज्ञान अगाध आहे ! तू साक्षात शंकर आहेस! मी दीन, अनाथ तुला शरण आहे. माझा उद्धार कर. मला जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून सोडव. तू इच्छामात्रे काहीही करू शकतोस म्हणूनच ही विनंती प्रार्थना करीत आहे. माझ्यावर कृपा कर.’ ”
ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले. त्याने सुमतीला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला. मग त्याच मंत्राने भारलेले भस्म तिच्या सर्वांगास लावले. त्या दिव्य भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा तत्काळ बऱ्या झाल्या. ती अप्सरांपेक्षाही सुंदर व तेजस्वी दिसू लागली. त्याने तसेच मंत्रोक्त भस्म तिच्या मृत पुत्राच्या अंगास लावले. त्यायोगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला. पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला.
ते पाहून पद्माकरास परम-आश्चर्य वाटले. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला धन्य-धन्य गुरुदेव ! धन्य-धन्य गुरुमंत्र ! जे श्रीगुरुचरणी नतमस्तक होतात त्यांना मृत्यूचे भय कोठून असणार ? त्यांना संसाराची, विपत्तींची भीती कधीच वाटत नाही. गुरुकृपेने त्यांच्या अंतःकरणातील भेदभाव दुःख यांचे समूळ निरसन होते. त्यांच्या सद्भाग्याचे किती कौतुक करावे ? त्यांना यश, कीर्ती, आयुरारोग्य, ऐश्वर्य, समृद्धी अशा सर्वच गोष्टी लाभतात. त्यांचे सर्व मंगलच होते!”
सुमतीचा आनंद काय वर्णन करावा ? तिने आपल्या पुत्राला हृदयाशी कवटाळले आणि कृतज्ञतेने ऋषभाकडे पाहू लागली. आपल्या मुलाला त्याच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, “सद्गुरुनाथा ! मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला, माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या, तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. ”
शिवयोगी म्हणाला, “मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भूत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करील. याची त्रिभुवनात कीर्ती होईल. मी याचे नाव ‘भद्रायू’ ठेवीत आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मी सांगितलेल्या मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप करा. हा विद्वान होईल. हा अनेक कलाविद्यांमध्ये पारंगत होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस.” ऋषभाने त्या मायलेकांना आणि पद्माकराला अनेक आशीर्वाद दिले व दुसऱ्याच क्षणी अंतर्धान पावला.
मग सुमती तेथेच राहिली. ऋषभाची आठवण झाली की तिला भरून यायचे. तिचा कंठ दाटून यायचा. डोळ्यांत अश्रू तरळायचे. पद्माकराने तिला धर्मकन्या मानले होते. तो तिला हवे नको ते सर्व पाहायचा. आपला मुलगा सुनय याच्यापेक्षा भद्रायूची जास्त काळजी घ्यायचा. त्याचे सर्व लाड पुरवायचा. आपल्या मुलाबरोबर त्या त्याचीही मुंज केली. दोघांच्या अध्ययनाकडे समान लक्ष दिले. त्यांना वेदशास्त्रसंपन्न केले. भद्रायू बारा वर्षांचा झाला. तो सुशील व धीरगंभीर स्वभावाचा होता. आईची सेवा करायचा. एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात एकट झाला. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्याचे पाय धरले. अश्रूंनी त्याचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन त्याचे पूजन केले. त्याची मनोभावे स्तुती केली, पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली, प्रेमपूर्वक सेवा केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला.
ऋषभाचा भद्रायूला धर्मनीतीपर उपदेश
ऋषभ म्हणाला, “बाळ भद्रायू । वेद, शास्त्रे आणि पुराणे ह्यांमध्ये धर्म य नीती ह्यांविषयक जे नियम सांगितलेले आहेत, त्यांचे यथायोग्य पालन कर. माता, पिता व गुरू ह्यांच्यावर निष्ठा ठेव. पुढे राजा झाल्यावर गो ब्राह्मण व प्रजाजन ह्यांचे नीट पालन कर. सर्व भुतांच्या ठायी एक शिवतत्त्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. वर्णाश्रमाला अनुसरून वाग. स्वधर्म कितीही कठीण असला तरी टाकू नकोस. विचारपूर्वक कृती कर. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे. याचे भान ठेवूनच बोल. सर्वत्र सावध राहा. मित्र कोण, शत्रू कोण, कोण आपला द्वेष करतो ते व्यवस्थित पडताळून पाहा. आपले उत्पन्न किती ? आपला खर्च किती आहे ? आपले सामर्थ्य किती आहे ? आपण कोठे दुर्बल आहोत ? आपले सेवक कसे आहेत ? ते कसे काम करतात ? त्यांचे वर्तन कसे आहे? ते आपले हित चिंतितात की अहित ? ते आपल्याला यश देतात की अपयश ? यांवर नेहमीच लक्ष ठेव.
अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, यज्ञकर्मे, पशू, शेती, विद्या आणि संपत्ती ह्यांच्याकडे वारंवार लक्ष द्यावे. त्यांची नीट काळजी घ्यावी. त्यांची अभिवृद्धी कशी होईल त्याचा सतत विचार करावा. आपली लहान मुले, आपली पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण यांची कधीच उपेक्षा करू नये. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी हानी होऊ शकते. विद्वान, ज्ञानी व सज्जन जसे आचरण करतात. तसेच वागावे. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. माता, पिता व साधू ह्यांची प्राणांतीही निंदा करू नये. वैश्वदेव करीत असताना कोणी अतिथी आल्यास त्याची जात पाहू नये. त्याला शिवस्वरूप मानून अन्नवस्त्र द्यावे. नेहमी परोपकार करावा. कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये. जो गो-ब्राह्मणांचे रक्षण करतो तोच सुज्ञ. वादविवाद, निंदा या गोष्टी टाकून शिवस्मरण करावे. तेच मौन होय. शंकराचे स्मरण करणे, त्याची सेवा करणे हीच मोठी तपश्चर्या आहे. परस्त्री, परद्रव्य ह्यांची अभिलाषा धरू नये. शिवपूजन यथासांग करावे. शास्त्रे श्रद्धेने ऐकावीत. स्नान, जप, अध्ययन, होम, गो-ब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. देव, भुते (अन्य जीव), ऋषी, पितर व मनुष्य ह्यांसाठी नित्यनेमाने अन्न, द्रव्य, वस्त्रादी त्याग करणे यालाच पंचयज्ञ म्हणतात. तो त्यागमय यज्ञ प्रेमपूर्वक करावा. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यांत कधीच आळस करू नये.
धर्मपत्नीवर प्रेम करावे, परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी. शत्रुंविषयी क्रोध, साधुजनांविषयी नम्रता द्वेष्ट्या जनांविषयी मद, संत व भक्त ह्यांविषयी विनय व साम्यभाव, संसारात संत्रस्त करणाऱ्या दुर्जनांविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. भल्या माणसांना वंदन करावे, पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान धरावा आणि ब्राह्मणांसन्मुख निरहंकार होऊन वर्ताव. शिवनाम घेतल्याने वाणीचे, दान दिल्याने हातांचे, देवळात गेल्याने, तीर्थयात्रा केल्याने पायांचे, पुराणांचे आदरपूर्वक श्रवण केल्याने कानांचे, साधुसंतांना आलिंगन दिल्याने त्वचेचे, शंकराचे दर्शन घेतल्याने डोळ्यांचे व स्तोत्र म्हटल्याने जिव्हेचे सार्थक होते. हे लक्षात घेऊन आपल्या इंद्रियांना तसे वळण लावावे. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले. त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल ह्याचा विचार करावा. शिवनिर्माल्य हुंगावे. दीन, अनाथ व अज्ञानी जनांना मदत करावी.
ईश्वरावर प्रेम करावे. संतांशी मैत्री करावी. देवांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करावी. योग्य काळी निद्रा घ्यावी. आहार-विहारावर नियंत्रण असावे. मृगयाही नीतीने करावी. विद्या, मैत्री व पुण्यप्राप्ती ह्यांचा हव्यास नको. उत्साह, धैर्य, दान व धारणा हे गुण नेहमी वाढते असावेत. आपले धन, आयुष्य, गृहकलह, मैथुन, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान ह्यांविषयी कुठेही वाच्यता करू नये.
गावाच्या सभेत कर्मभ्रष्ट, वेदविरोधी, लबाड, धूर्त चहाडखोर, चोर, व्यभिचारी, पापी, कपटी, चंचल, नास्तिक पोरकट व खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, गुरुपत्नीशी वा अगम्य स्त्रीशी संग करणारे, वाटमारे, कृतघ्न, धर्मनष्ट ह्यांचे दर्शन करू नये.
पत्नी, पुत्र व धन ह्यांची जराही आसक्ती नसावी. त्यांच्याशी कर्तव्यबुद्धीने वागावे. संसारात अलिप्त असावे. बंधू, सोयरे, सासू-सासरे, स्वजन ह्यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. भलत्या गोष्टींची हाव धरू नये. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणान्तीही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. शिवकवच म्हणून सर्वांगी भस्म चर्चिले असता रणांगणात शस्त्रास्त्रबाधा
होत नाही. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. त्या मंत्राचे निष्ठेने नित्य पठण केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्युभय नाहीसे होते.
आततायी, मार्गस्थांचा घात करणारे, ब्राह्मणांना जीवे मारणारे ह्यांचा (राजाने) वध करावा. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ह्या व्रतांचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शिवकीर्तन, हरिकीर्तन ऐकण्यास जावे. ते लक्षपूर्वक श्रवण करावे. महापर्व, कुयोग, श्राद्ध, व्यतिपात, वैधृती व संक्रांत या काळात स्त्रीसंग करू नये. ग्रहणकाळात भोजन करू नये.
शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. अयोग्य व्यक्तीस दान दिल्याने दारिघ्र येते. वेद, शास्त्रे, पुराणे व भगवद्भक्तीपर कीर्तन हे गुरूकडून व ब्राह्मणाकडून श्रवण करावे. त्यात एक वेगळाच आनंद असतो. गुरू व ब्राह्मण ह्यांना दान दिल्याने पुण्य तिप्पट होते. पूज्य माणसाचा अपमान करून अपूज्य माणसाचा सन्मान केला तर भय उपजते, दुर्भिक्ष येते व कधी मरणही ओढवते. खोल विस्तीर्ण प्रवाहात उडी मारणे, महापुरुषाशी भांडण करणे व बलवंताला आव्हान देणे ही अनर्थाची द्वारे आहेत.
हाताची शोभा कंकणांनी आणि मुद्रिकींनी वाढत नाही. ती दानाने वाढते. कानात कुंडले घालून काय उपयोग ? चांगल्या गोष्टी श्रवण करणे यातच त्यांची सार्थकता ! सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्यादी सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होय. स्पष्ट बोलणे, खरे बोलणे, हेच वाणीचे व्रत होय. जे विद्यावंत असतात त्यांच्या सन्मानार्थ तत्काळ काही ना काही द्यावे. संकटकाळी धैर्य धरावे, वादात वाणीने विजय मिळवावा, युद्धात पराक्रम करावा, याचकांना विन्मुख पाठवू नये, भोजनाला बसताना पंक्तीला ब्राह्मण असावा, मित्र असावा, पुत्र असावा. ज्या मार्गाने हत्ती, घोडे जाऊ शकतात त्याच मार्गाने चालत जावे. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. अनाथ, बेवारशी प्रेताला अग्निसंस्कार करणे, त्याचे क्रियाकर्म करणे हे अतिशय पुण्यप्रद होय. ब्राह्मणांचा द्वेष करणे ह्यासारखे घातक विष नाही. सत्संग अहोरात्र करावा. त्याच्यापुढे अमृतही तुच्छ आहे. जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून चरफडत नाही, जो दुसऱ्याच्या आनंदात मनःपूर्वक सहभागी होतो, जो दुसऱ्याचे शुभवृत्त ऐकून खूश होतो, जो सर्वांचे हित चिंतितो, तोच खरा शिवभक्त !
पृथ्वीवर अनेक प्रकारची मौल्यवान रत्ने सापडतात. पण ती तर निर्जीव पाषाण होत. खरी चारच मोठी रत्ने आहेत. अन्न, पाणी, सुभाषिते व औदार्य ! कोणाच्याही वर्मावर बोट ठेवून त्याला अपमान करू नये. साधुसंतांचे आशीर्वाद घ्यावेत. ईशकृपेने भाग्योदय झाला, तरी स्वधर्म सोडू नये. पूर्वीच्या शत्रूने आता मित्रत्व केलेले असले, तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. गर्भवती स्त्री जशी गर्भाची काळजी घेते, तशी राजाने प्रजेची काळजी घ्यावी. गुरू आणि शंकर हे एकरूपच आहेत, त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. आपले भाग्य, आपली विद्या यांचा गर्व करू नये. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो. त्यात त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर, ते सौंदर्य अधिकच खुलते. जर तो ज्ञानी असेल, तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल, तर तो सर्वश्रेष्ठ होय. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन या आठ गोष्टींचा फार लवकर गर्व होतो. म्हणून सावध राहावे. मनाला त्यात गुंतू देऊ नये.”
सूत पुढे म्हणाले, “अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रायूला अनेक प्रकारे सद्धर्माचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला जगद्व्यवहारात अडचणी येणार नाहीत. ” कवी म्हणतो, “हा सातवा अध्याय म्हणजे कैलासपर्वत! त्यावर उमारमण वास करतो. याचे पारायण हीच गिरिप्रदक्षिणा ! ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय ! भक्ती ही त्याची कन्या, उमा. तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे !
पुढील अध्यायात शिवयोगी भद्रायूवर कृपा करतो याविषयीचा कथाभाग आहे. तो अध्याय श्रवण केल्याने विद्वानांना ब्रह्मानंद होईल. श्रीधराला वर देणारा सद्गुरू ब्रह्मानंद यतिंद्र हा संसाररूपी हत्तींचे विदारण करणारा सिंहच होय. तो आनंदाचा सागर आहे. जगाचा गुरू व जगाचा आत्मा असणाऱ्या शंकराच्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तरखंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा सातवा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी नो नेहमी श्रवण करावा.’
|| अध्याय सातवा समाप्त ।। ।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥



