
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीट, वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’..
राज्य प्रतिनिधी
उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २६) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या प्रणालीपासून, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (ता. २६) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.



