vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

अधिकमास मास माहात्म्य* l*अधिकमास माहात्म्य – अध्याय एकोणिसावा*

अधिकमास मास माहात्म्य*

l*अधिकमास माहात्म्य – अध्याय एकोणिसावा*

 

*ॐ नमःशिवाय*

अध्यात्मिक वार्ता

*अधिकमास मास माहात्म्य*

l*अधिकमास माहात्म्य – अध्याय एकोणिसावा*

 

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी श्रीगुरुसमर्था ॥ भाविकांते मोक्षदाता ॥ अनाथनाथा कृपावंता ॥ करुणाकर दीनबंधो ॥ १ ॥

 

अगाध भक्‍तीचा महिमा ॥ भक्‍तप्रिया सर्वोत्तम ॥ भक्तीविण निर्थक जन्मा ॥ प्राणियांचा निर्धारें ॥ २ ॥

 

यालागीं भाव धरून अंतरीं ॥ प्रचीत स्वस्थ शरीरीं ॥ आत्मप्रचीत गुरुप्रचीतवरी ॥ शास्त्रप्रचित तिसरी जानिजे ॥ ३ ॥

 

म्हणोन दृष्टांतीं कथाभाग सत्य ॥ स्वयें बोलिला श्रीअंत ॥ ही जाणिजे शास्त्रप्रचीत ॥ एका दृष्टांतांत ॥ ४ ॥

 

वक्ता वदेलचा अर्थ ॥ तो जाणिजे गुरुकृपा साचार ॥ भाव धरूनि उकलावें अंतर ॥ मग मुलाखत आत्मप्रचीती ॥ ५ ॥

 

आणि तिन्ही प्रचीती देखी ॥ प्रवर्तावें श्रोतेजनीं ॥ याउरी मलमास कथनीं ॥ श्रोतेजनीं परिसावी ॥ ६ ॥

 

लक्ष्मी नारायण संवाद ॥ तोची श्रोतियां करूं विशद ॥ ऐका विचक्षण सावध ॥ जेणें हरेल वेध मानसीं ॥ ७ ॥

 

क्षीराब्धिजा वदे पुरुषोत्तमा ॥ अनुपम्य ऐकिला जी महिमा ॥ तरी आणखी परिसावें नेमा ॥ कवणे परी आचरावें ॥ ८ ॥

 

कवण उद्धरोनि गेला ॥ कवणें नाव असा साधिला ॥ हा तंव विस्तार आगळा कृपा करून वदावा ॥ ९ ॥

 

ऐकून लक्ष्मीची वाणी बोलता जाला चक्रपाणी ॥ म्हणे ऐकहो शुभकल्याणी एकाग्र करून मानस ॥ १० ॥

 

मेरु सिंधौतु नगरी वर्तते बहुविस्तारा ॥ नाम्ना शिवपुरी ख्याता शिवासि प्रिया सदा ॥ १ ॥

 

गोकर्णस्य गिरेः प्रार्श्वे प्रासादात्तलभूषिता ॥ बश्चर्यवतीरम्या रम्यचत्वर शोभिता ॥ २ ॥

 

नाना ब्राह्मणसंयुक्ता क्षत्रियश्च विराजिता ॥ वैश्यः शूद्रै स्थानन्यश्च संयुक्ता सत्यवादिभिः ॥ ३ ॥

 

तस्यामासीत्सदाचारः शूद्रः कश्चिद्वरोगृही ॥ नामनापि विप्रदासोसौ कमर्णापि तथाविधः ॥ ४ ॥

 

तस्य पत्‍नी विप्रदासीसा नाम्ना शुभलक्षणा ॥ साध्वी पतिपरापत्युराज्ञासन्निता सदा ॥ ५ ॥

 

मेरु तळाचिया ठायीं जाण ॥ शिवकांची नगरी विस्तीर्ण ॥ ब्रह्मसमुदावो परिपूर्ण ॥ अध्ययन घरोघरीं ॥ ११ ॥

 

गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी असे ॥ क्षुद्र क्षेत्री सर्व धर्म वसे ॥ वेदमार्गे वर्तती पैं ॥ १२ ॥

 

वेदमर्यादा नुलंघिती कोणी ॥ ब्राह्मणा पूजिती वर्ण तिन्ही ॥ श्रौतस्मार्त अवग्रहणीं ॥ सदाचारें ब्राह्मण वर्तती जे ॥ १३ ॥

 

नगराची रचना अतिअद्‍भुत ॥ एका जननयन तटस्थ होत ॥ रम्य गोपुरें लखलखीत ॥ बरवी झळकत रविकिरणें ॥ १४ ॥

 

तया नगरीं एक शूद्र जाण ॥ नाम तयाचें विप्रदास म्हणोन ॥ बाहाताती सर्वही जन ॥ सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा ॥ १५ ॥

 

एका विप्राचिया घरीं ॥ करून सेवा चाकरी ॥ निरंतर वर्ते सदाचारी ॥ विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा ॥ १६ ॥

 

तयाची भार्या पतिव्रता पूर्ण ॥ नुलंघी कदा पतिवचन ॥ तेही विप्रसेवा करूनि जाण ॥ कुटुंब रक्षण करिताती ॥ १७ ॥

 

याउपरी एके दिनी ॥ मलमासे संधी जाणुनी ॥ विप्रमेळा तये क्षणीं ॥ स्नानालागुनी चालिले ॥ १८ ॥

 

तंव ते शुद्रकामिनी ॥ विनवी भ्रतारालागुनी ॥ समस्त जग मिळोनी ॥ स्नानालागुनी जाताती ॥ १९ ॥

 

तरी आपण वर्णहीन याती ॥ केवी न घडेल पुण्यप्राप्ती ॥ द्रव्यही नाहीं संचितीं ॥ जे दान पद्धती करावी ॥ २० ॥

 

यालागीं प्राणनाथा पाहीं ॥ विप्रा सांगातें चला सर्वही ॥ दानधर्मातें धन तें नाहीं ॥ परी करूं देह पवित्र ॥ २१ ॥

 

स्नानें करून पवित्रता ॥ ऐसी वदतसे जनवार्ता ॥ यालागीं विप्रातें प्रार्था ॥ न्यावे तत्वता समागमें ॥ २२ ॥

 

ऐसें ऐकून उत्तर ॥ द्रवलें शूद्राचें अंतर ॥ मग प्रार्थूनिया द्विजवर ॥ निघाला सत्वर कुटुंबेंसि ॥ २३ ॥

 

यात्रेचा समुदावो पातला ॥ गोकर्ण क्षेत्राप्रति आला ॥ पाहोन तेथीच्या गंगाजळा ॥ तटस्थ जाला समुदावो ॥ २४ ॥

 

गंगा पाहतांच नयनीं ॥ तात्काळ पातका होय धुणी ॥ समग्र जन स्नानालागुनीं ॥ तये स्थानीं उतरले ॥ २५ ॥

 

नित्य करिती स्नानदानास ॥ यात्रा राहिली एक मास ॥ विप्रासवें शूद्रही स्नानास ॥ स्त्रियेसहीत जातसे ॥ २६ ॥

 

नित्य स्नान-विधीसारूनी ॥ मग पुष्पबिल्वादी आणुनी ॥ नित्य पूजितसे शिवभवानी ॥ भावार्थ मनी आगळा ॥ २७ ॥

 

उभयतां जाऊनि वनांत ॥ काष्ठभारा आणिती नित्य ॥ त्याचा विक्रय करून सत्य ॥ द्रव्य संचय करिताती ॥ २८॥

 

मौन्य न बोलती कवणासी ॥ नक्‍त राहती उपवासी ॥ सायंकाळीं सारिती भोजनासी ॥ नित्यनेमेसी वर्तत ॥ २९ ॥

 

ऐसे व्रत संपूर्ण एकमास ॥ उभयतां आचरली निर्दोष ॥ पाप जळालें निःशेष ॥ नाहीं लवलेश तिळभरी ॥ ३० ॥

 

मग संचयो जो धनाचा ॥ नित्य विक्रय काष्ठाचा ॥ तो काढुनियां तयाचा ॥ व्यय करिते पैं जाले ॥ ३१ ॥

 

यथायुक्त ब्राह्मण भोजन ॥ करिते जाले उद्यापन ॥ त्रयचि दशक अपूप अन्न ॥ केलें अर्पण द्विजातें ॥ ३२ ॥

 

मग शेवटीं ते उभयतां ॥ भोजनीं बैसलें तत्वता ॥ घेऊन विप्रांची मंत्राक्षता ॥ बिराडमार्गी चालिले ॥ ३३ ॥

 

तंव नवल वर्तलें तये क्षणीं ॥ रात्र जाली एक यामिनी ॥ तंव एक पिशाच मार्गस्थानीं ॥ उभां येऊनि ठाकला ॥ ३४ ॥

 

विक्राळ वदन भयंकर ॥ लंबबाहो विशाळ शरीर ॥ मुख पसरूनि क्षुधातुर ॥ धांवला समोर ग्रासावया ॥ ३५ ॥

 

तयातें पाहून उभयांनीं ॥ तटस्थ ठेले तयास्थानीं ॥ तंव दैवयोगें करूनीं ॥ अपूर्व काहाणीं पैं जाली ॥ ३६ ॥

 

पुण्यशरिरी शूद्रदंपत्य ॥ पाहूनी पिशाच प्रेत ॥ क्रूर भावना निरसून तेथें ॥ जाला बोलतां शूद्रातें ॥ ३७ ॥

 

म्हणे महापुरुषां तू कोण ॥ येथें यावया काय कारण ॥ मी तंव क्षुधीत पिशाच जाण ॥ करावया भक्षण आलों तुम्हां ॥ ३८ ॥

 

परी तंव दर्शनें समाधान ॥ पावन जालें माझें मन ॥ तूंतें करितां संभाषण ॥ वाटे पावन होईन मी ॥ ३९ ॥

 

आजवरी या पर्वतशिखरीं ॥ मी फिरत होतों वनांतरी ॥ वृकव्याघ्र नानापरी ॥ क्षुधाहारीं हिंडतसे ॥ ४० ॥

 

परि क्षुधा न धाय सर्वथा ॥ या क्षुधेंत फिरे मी तत्वता ॥ तंव दृष्टीस देखिलें अवचिता ॥ विप्रदासा तुजलागी ॥ ४१ ॥

 

तरी कृपावंता दयानिधी ॥ निरसी माझी भवव्याधी ॥ देऊनियां पुण्य औषधी ॥ भवभयव्याधी हरावी ॥ ४२ ॥

 

ऐकून तयाचें उत्तर ॥ शूद्र वदे तेव्हां प्रत्युत्तर ॥ म्हणें तूं पूर्वी होतासि थोर ॥ ते सविस्तर निवेदी ॥ ४३ ॥

 

कवण पापास्तव पाहें ॥ पिशाच देह लाधला आहे ॥ तो सांगे लवलाहें ॥ पुढें उपाय विचारू ॥ ४४ ॥

 

येरू म्हणे ऐकें स्वामिराजा ॥ पूर्वी मीं क्षेत्रज वंशी राजा ॥ होतों पराक्रमीं तेजःपुंजा ॥ शत्रु सहज पायातळी ॥ ४५ ॥

 

सर्वांवरी दरारा पाहें ॥ कापती सर्वही राये ॥ यवन मंडळी पाळीं निर्भय ॥ नाहीं भयपापाचें ॥ ४६ ॥

 

पुण्य लेश नाहीं सर्वथा ॥ स्वप्नीं नेणें धर्मवार्ता ॥ मार्ग पाडून तत्वता ॥ वस्तु हरीं मार्गस्थांच्या ॥ ४७ ॥

 

परद्वार असंख्यात ॥ मज घडले अपरमित ॥ माझिया पापा नाहीं गणित ॥ सौख्या अमीत भोगिलें ॥ ४८ ॥

 

आपपर नेणें सर्वथा ॥ प्रजेतें नागवीं तत्वता ॥ त्यांचिया शापें मज ताता ॥ क्षयरोग लागला पैं ॥ ४९ ॥

 

त्यायोगें मृत्यु पावलों सवेग ॥ यमदूतीं कर्शूनियां आंग ॥ दुर्धर माझा पापभोग ॥ जाणुनि जाचिती मजलागीं ॥ ५० ॥

 

मी दानधर्म केलाच नाहीं ॥ अतीत अभ्यागत नेणें कांहीं ॥ तीर्थ पर्वणी स्वप्नीही ॥ पाहिलीं नाहीं पापिष्टें ॥ ५१ ॥

 

द्रव्य असूनि माझे पदरीं ॥ मी तव तीर्थ दान न करीं ॥ सरली आयुष्याची दोरी ॥ नरक अघोरी टाकिलें मज ॥ ५२ ॥

 

मग तेथें बहु पस्तावलों ॥ अहा देवा स्वधर्म आंचरलों ॥ पापातें मी नाहीं भ्यालों ॥ मदबळें करूनियां ॥ ५३ ॥

 

मग तेथें उपाव नसे काहीं ॥ हिंपुटी जालों स्वदेहीं ॥ द्रव्य जोडिलें तेंही ॥ राहिलें जेथिचें तेथेंची ॥ ५४ ॥

 

व्यर्थ गेलीं माझी वयसा ॥ पापबळें जोडिला पैसा ॥ संसारकारणीं सर्व आशा ॥ शेवटीं नाशा पावलों ॥ ५५ ॥

 

मिळोनीं काका मामा आत्या ॥ बंधुभगिनी आणि चुलत्या ॥ मिळूनियां मज भोंवत्या ॥ वाटोळे केलें द्रव्याचें ॥ ५६ ॥

 

सासूसासरा विहिणी ॥ सुना जावई काकी मामी ॥ आपा आबा सर्वांनीं ॥ वेढिले मजलागी धनलोभें ॥ ५७ ॥

 

शेवटीं अंतकाळ आला ॥ सकळ जालीं सभोंवती गोळा ॥ हात देऊनी कपाळा ॥ रडती खळखळा धनासाठीं ॥ ५८ ॥

 

म्हणती छत्र गेलें आमुचें ॥ कोण रक्षण करील कुटुंबाचें ॥ शेवटीं नाहीं कोणी कोणाचें ॥ सर्वही जायाचें सर्व लेणें ॥ ५९ ॥

 

ऐसी गती माझी झालीं ॥ शेवटीं यमयातना प्राप्त झाली ॥ सर्व आटलें तये काळीं ॥ सोडविता बळी न दिसे पैं ॥ ६० ॥

 

काळाचे मुखींहूनी सर्वथा ॥ न देखों कोणी सोडविता ॥ यालागीं विचक्षण जनीं तत्वता ॥ मोक्षपंथा स्मरावें ॥ ६१ ॥

 

एका सद्‍गुरू वांचुनी ॥ उपाव नाहींच त्रिभुवनीं ॥ तोची सोडवी काळापासुनी ॥ इतरांची कहाणी न चलेची ॥ ६२ ॥

 

ऐसा मी फार पस्तावलों ॥ शेवटीं रवरवीं पडता जालों ॥ तेथें बहुत जाजावलों ॥ कुसमुसलों अंतरीं ॥ ६३ ॥

 

तेथें कुंभपाक कुंड ॥ तळीं विस्तीर्ण लहान तोंड ॥ तयामाजी नरक भरला उदंड ॥ तोचि दंड प्राणियातें ॥ ६४ ॥

 

त्यामाजी नेउनी टाकिती ॥ एकावरी एक रिचविती ॥ उसंत नाहीं निघावयाप्रती ॥ बुचकळ्या घेती एकाएक ॥ ६५ ॥

 

तंव टोले देती यमदूत ॥ मागुते आंत लोटीत ॥ नाकीं तोंडीं भरत नरक तो ॥ ६६ ॥

 

ऐसो जाचणी दिवस बहुत ॥ भोगिली सहस्र वर्षे परियंत ॥ शेवटी मज काढूनि देत ॥ पिशाच योनींत टाकिलें ॥ ६७ ॥

 

तेथे क्षुधा लागतां बहुत ॥ परी संकीर्ण रंध्रमुखांत ॥ कवळमध्यें अडकत ॥ क्षुधा शांत न होय ॥ ६८ ॥

 

उदक प्राशनासी नाहीं ॥ संवदनीचें किंवा अशौच्य देहीं ॥ निर्मळ पाहतातें नाहीं ॥ ऐसी देहीं दुःखयातना ॥ ६९ ॥

 

वस्त्र नाहीं दिगंबर ॥ वृक्षावरी आमुचें घर ॥ ऐसा भोग तीस हजार ॥ संवत्सर भोगावा ॥ ७० ॥

 

यालागीं भाकितों करुणा ॥ कृपाळू तू तापसी राणा ॥ देऊन कांहीं पुण्यदाना ॥ निवारी यातना माझी हे ॥ ७१ ॥

 

अवघे गेले सुखाचे सांगाती ॥ शेवटी झाली हे माझी गती ॥ कृपासागरा दयामूर्ति ॥ करीं निवृत्ती पापाची ॥ ७२ ॥

 

येवढा उपकार करीं ॥ सुकृत बांधीं आपुले पदरीं ॥ चुकवीं माझी जन्ममरण फेरी ॥ थोर उपकारीं बुडेन मी ॥ ७३ ॥

 

ऐसी करुणादीन वाणी ॥ ऐकून शूद्र द्रवला अंतःकरणी ॥ मग उदक करीं घेऊनी ॥ संकल्पुनी सोडित ॥ ७४ ॥

 

म्हणे महापुरुषा ऐक ॥ तूं तंव कर्मपातकी देख ॥ तूं तें पाहूनि अधिक ॥ दया मातें उपजली ॥ ७५ ॥

 

तरी सप्तदिन स्नानाचें फळ ॥ मी आचरी जो केवळ ॥ मलमाहात्माचें निर्मळ ॥ तें हें जळ असे पैं ॥ ७६ ॥

 

या सप्तदिनाचे पुण्येकरून ॥ तुझें पापक्षाळण ॥ तात्काळ जाई उद्धरून ॥ ऐसें म्हणोन उदक सोडिलें ॥ ७७ ॥

 

तें उदक पडतां प्रेतहस्तीं ॥ तेथें आश्चर्य झाले श्रोतीं ॥ अवधाराहो परमप्रीती ॥ महापातकी उद्धरला ॥ ७८ ॥

 

तात्काळ दिव्य देह पावला ॥ प्रेतभाव सर्व लोपला ॥ तंव अकस्मात देखिला ॥ घंटारव स्वर्गीचा ॥ ७९ ॥

 

दिव्य विमान स्वर्गीहून ॥ तात्काळ उतरलें तयेक्षण ॥ लखलखीत देवगण ॥ उभे येऊन ठाकले ॥ ८० ॥

 

पिशाच उद्धरला तात्काळ ॥ विमानीं बैसवोनि गेला ते वेळ ॥ नेत्रीं पाहते जाले सकळ ॥ म्हणती धन्य फळ स्नानाचें ॥ ८१ ॥

 

मलस्नान अगाध महिमा ॥ कृपाळु तो सर्वोत्तमा ॥ धन्य या शूद्राच्या नेमा ॥ केलें कर्म अघटित ॥ ८२ ॥

 

स्वयें पुण्याचें दान केलें ॥ ऐसें कधी देखिलें ना ऐकिलें ॥ ऐसिया पापिया तें उद्धरिलें ॥ अनुपम्य केलें या शूद्रें ॥ ८३ ॥

 

आश्चर्य करून सर्वांनी ॥ येऊन लागती शूद्रचरणीं ॥ जयजयकार गोकर्णी ॥ प्रवर्तला आदरें ॥ ८४ ॥

 

मग नानापरी दिव्यान्न ॥ ठायीं ठायीं विप्रभोजन ॥ होता पुराणकथा श्रवण ॥ आनंद पूर सर्वांतें ॥ ८५ ॥

 

ऐसा मलमास स्नानमहिमा ॥ निवेदिला श्रोतयां तुम्हां ॥ जो कथिला सार्वभौमा ॥ श्रीविष्णु लक्ष्मीते ॥ ८६ ॥

 

तोचि प्राकृत भाषे वैखरीं ॥ भरविला श्रोतियांचे कर्णद्वारीं ॥ न्यून पूर्ण तो चतुरीं ॥ क्षमा मजवरी पैं कीजे ॥ ८७ ॥

 

मलमहात्म अगाध महिमा ॥ जेणें संतोष पुरुषोत्तमा ॥ म्हणोनि धरिजे अतिनेमा ॥ अनुक्रमें संपादावा ॥ ८८ ॥

 

कांहीं धन न लागतां बहुत ॥ फुकाचें पुण्य असे जोडत ॥ यालागीं साधावें हिताहित ॥ हेची विहित सर्वदां ॥ ८९ ॥

 

शेवट कोणी कोणाचें नाहीं ॥ एकटें पडणें लागे प्रवाहीं ॥ धनधान्यतें सर्वही राही ॥ जेथील तेथेंची ॥ ९० ॥

 

यालागीं करा काढाकाढी ॥ साधा बापानों लवडसवडी ॥ जेणें सुटे काळाची वोढी ॥ ऐसी तांतडी करावी ॥ ९१ ॥

 

इति श्रीमलमासमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणाचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ एकोनविंशोध्याय गोड हा ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्याः ९१ ॥

*॥ इति एकोनविंशोऽध्यायः ॥*

*ॐ नमःशिवाय*

संबंधित पोस्ट

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम

प्रारब्ध म्हणजे काय ?

vishwatmaklokswamivarta

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा….नर्मदे हर ।।

vishwatmaklokswamivarta

आनंदमय वातावरणात निरंकारी संत समागमाची सांगता,दिव्य गुणांचा अंगीकार करुन यथार्थ मानव बनावे-सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

vishwatmaklokswamivarta

🙏🏻🌹☘️ गुरु ☘️🌹🙏🏻 गुरुचे जीवन तसे असले पाहिजे. ” गुरु”

vishwatmaklokswamivarta

*दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात…?* *

vishwatmaklokswamivarta