
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा….नर्मदे हर ।।
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही तिलकवाडा(गुजरात) येथील श्री वासुदेव कुटीर आश्रमाच्या माध्यमातून तेथील प्रमुख श्री विष्णुगिरी स्वामीमहाराज आयोजित करतात।सदर परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण नर्मदा परिक्रमा केल्यानंतर जे पुण्यफल प्राप्त होते तेच पुण्यफल ही चैत्र महिन्यातील एकदिवसीय उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर मिळते।संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे प्रत्येकाला जमेलच असे नाही।कारण स्वास्थ्य, वेळ व इतर काही कारणामुळे बरेच जणांना पूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य होत नाही।त्यांच्यासाठी हा उत्तरवाहिनी परिक्रमेचा पर्याय योग्य ठरतो।या परिक्रमेत दोन्ही तट मिळून 21 किमी चालावे लागते।त्याला साधारण 6/7 तास वेळ लागतो।दोन्ही तटावरील आश्रम व मंदिरे यांचे दर्शन घेत जऱ आलात तर एखादा तास जास्त लागतो।
ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते।साधारण 10 km चालल्यानंतर उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते। येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते।दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते।या 21 किलोमीटर प्रदक्षिणेची परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे,आश्रम लागतात। जागोजागी नर्मदे हर…नर्मदे हर… असे म्हणून स्वागत होते। गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी,सरबत,चहा,फळे किंवा छास अशी सेवा देतात। परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनार्यावरून जाणारा आहे। काही ठिकाणी वाट बिकट आहे। पण कसलाही त्रास न होता आपण आरामात उतर तट पार करतो।या उलट दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे। दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे। येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करतात।येथे बालभोग घेऊन आपली पुढे वाटचाल सुरू राहते।थोड़े पुढे आले की पंचकुबेर पैकी एक धनेश्वर महादेव मंदिर आहे।त्याला लागूनच रामजानकी आश्रम आहे।पुढे वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते।यागावात मंगरलेश्वर महादेव मंदिर वत्याला लागूनच दिव्यधाम आश्रम आहे।आश्रमात श्रीमद आद्य शंकराचार्य यांची सुंदर मूर्ती आहे।या गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात।येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते। या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल। मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत।तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम।प.पू.श्री पूर्णानंद सरस्वती स्वामीमहाराज यांच्या तपस्येने अतिशय जागृत झालेला हा आश्रम आहे।हे स्वामी आठवड्यातुन फक्त एकदा खिड़कीमधून सर्वांना दर्शन देतात।त्यामुळे या भागात त्यांना खिड़कीवाले बाबा या नावाने ओळखतात। या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छास सेवा देतात।नंतर मार्गात लागतो तो श्री रामानंद आश्रम।श्रीराम आणि जानकीच्या सुंदर,मनोहारी मूर्ति येथील मंदिरात आहे।इथेही भोजनप्रसादीची व्यवस्था आहे।आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो तो श्रीसीताराम बाबांचा आश्रम। आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे।देवीचे सुंदर मंदिर आहे।आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते। येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन थोडाफार विश्राम करून खाली उतरुन मैय्याच्या जवळून चालत नावड़ीपर्यन्त यावे लागते।हे अंतर साधारण दीड किमी आहे।नावेत बसून उत्तर तटावर यायचे।मैय्यामध्ये स्नान केले की परिक्रमा पूर्ण होते।
या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्वर येथील प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्वर येथील श्री रंगावधूतजी स्वामीमहाराज यांचे तपस्या स्थान व समाधी दर्शन,अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान,कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो।तसेच खुद्द तिलकवाड्याची भूमी देखील परमपवित्र आहे।गौतमऋषीची ही तपस्या भूमि आहे।वैवस्वत मनुचा मुलगा राजा तिलक याची देखील हीच तपस्या भूमि राहिली आहे।राजा तिलक याने तपस्याद्वारे महादेवाला प्रसन्न करून घेतले व येथे वास्तव्य करण्याची प्रार्थना केली।म्हणून येथे तिलकेश्वर महादेव हे मंदिर आहे।म्हणून गावाचे नाव तिलकवाडा असे पडले।या तिलकेश्वर महादेवाचे म्हणजे आपल्या पित्याचे दर्शन घेण्यासाठी म्हणून नर्मदा मैय्या येथे उत्तरवाहिनी झाली आहे।हे मंदिर गावातच आहे।तसेच येथे सप्तमातृका मंदिर आहे।मंदिर छोटेसेच आहे पण अतिशय जागृत आहे।संत श्री रामदासस्वामी यांनी स्थापन केलेला ज्ञानमुद्रा धारण केलेला मारुती आहे।अशीज्ञानमुद्राधारीमारुतीच्या फक्त 3 मूर्ति पूर्ण भारतात आहेत।या मारुती समोरच एका महात्म्याची संजीवन समाधी आहे।मोक्ष प्रदान करणारा मारुती व मोक्ष प्रदान करणारी उत्तरवाहिनी नर्मदामैय्या यांची अशी ही भूमि बघूनच प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांनी येथे एक चातुर्मास केला आहे।त्याच ठिकाणी आता श्री वासुदेव कुटीर हा आश्रम आहे।गावातच श्री पंड्या यांच्या घरी श्री स्वामींनी वापरलेल्या काही वस्तु,चरणधूळ व हस्ताक्षर असलेले पत्र आहे।कायम वास्तव्य करावे अशी ही तिलकवाड्याची भूमि आहे।उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमाच्या निमित्ताने किमान वेळ काढून एक दोन दिवस तरी येथे वास्तव्य जरूर करावे।
श्री वासुदेव कुटीर आश्रमातर्फे विनायकी चतुर्थीच्या दिवशी या परिक्रमेचे आयोजन केले जाते।या दिवशी आयोजित करण्याचे महत्वाचे 2 कारण आहेत।बळी राजाच्या कन्येचे म्हणजे रेवतीचे लग्न जमत नव्हते।ते व्हावे म्हणून बळीराजाने तप केले।तेव्हा देवांनी ही परिक्रमा 5 वेळा करायची आज्ञा दिली व नर्मदा मैय्याच्या आशीर्वादाने तुझे मनोरथ पूर्ण होईल असे सांगितले।त्यावेळी बळीराजाने पहिली परिक्रमा याच मुहूर्तावर केली होती। अशा 5 परिक्रमा केल्यानंतर बळीराजाला मैय्याने दर्शन दिले होते व रेवतीसाठी योग्य वर सांगून आशीर्वाद दिला।त्यामुळे बरीच लग्नेच्छु तरुण-तरुणी ही परिक्रमा सुयोग्य जोड़ीदार मिळावा म्हणून करतात।
तसेच सततस्मरणीय प.पू.श्री रंगावधूत स्वामीमहाराज यांनी सुद्धा याच तिथीला ही परिक्रमा केली आहे।आणि तिसरे महत्वाचे कारण गंगा मैय्या शुद्ध होण्यासाठी याच तिथीला नर्मदा मैय्यामधे येते अशी मान्यता आहे।
जरी पूर्ण चैत्र महिन्यातील कुठल्याही दिवशी ही परिक्रमा करता येत असली तरी अशा या परमपावन मुहूर्तावर आश्रमातर्फे फक्त एकदाच ही परिक्रमा आयोजित केली जाते।
कुठलीही परिक्रमा करताना पुण्य मिळेल न मिळेल,अनुभूति मिळेल न मिळेल पण संचित मात्र काही प्रमाणात अवश्य नष्ट होते।सरस्वती नदीत 3 वेळा,गंगा नदीत 1 वेळा स्नान केल्यानंतर पुण्य मिळते तर तेच पुण्य नर्मदा मैय्याच्या नुसत्या दर्शनाने मिळते।अशी नर्मदा मैय्याची महती आहे।आपणही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करून आपले जीवन पावन करून घ्यावे।
त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼



