
मुंबई कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता…
राज्य प्रतिनिधी
राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरूवारी (ता. ७) सकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली.
मुंबई कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर ओडिशा आणि छत्तीसगड परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, जैसलमेर, उदयपूर, इंदोर, बेतूल, गोंदिया, रायपूर, गोपालपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. मराठवाडा, आणि विदर्भातील काही जिल्ह्यता विजांसह पावसाची शक्यता आहे



