
एनएमएमएसएस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत
सांगली, प्रतिनिधी : सन २०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP २.०) (www.scholarships.gov.in ) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत NMMSS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षाची इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनी नवीन अर्जदार म्हणून आणि 9 वी, 10 वी, 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधार नुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल.
तर केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ( इयत्ता ९ वी आणि १० वी ) शिष्यवृत्ती लागू केली आहे. NSP २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. या योजनेचे तपशील शिक्षण संचालनालय (योजना) विभागाच्या वेबसाइटवर (www.depwd.gov.in) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarships.gov.in) वर उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
एनएमएमएसएस साठी पात्रतेचे निकष – पालकाचे उत्पन्न 3 लाख 50 हजार रूपये पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह ) शाळेतील विद्यार्थांना सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र /राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट . ) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .



