
जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व वाहतूक करण्यास,अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी.
सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दि. 18 ऑगस्ट 2023 च्या निर्बंध आदेशामध्ये सुधारणा करून जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व जिल्ह्यांतर्गत जनावरांची वाहतूक करण्यास पुढील अटी व शर्तीस अधिन राहून आदेश निर्गमित केले आहेत.
दि. 6 नोव्हेंबर 2023 अखेर 353 इतकी असून अटी व शर्तीस अधिन राहून जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व जिल्ह्यांतर्गत जनावरांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही असा अभिप्राय प्राप्त झाला असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आदेशात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातंर्गत वाहतूक करावयाच्या गुंराचे लम्पी चर्म रोगाकरीता २८ दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची/म्हैशींची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. गुरांची वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील सक्षम अधिकाऱ्याने दिलेला आरोग्य दाखला तसेच वाहतूक प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. आठवडी बाजार भरण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतूनाशक व किटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे. आठवडी बाजार परिसरात फक्त कानात टॅग मारलेल्या जनावरांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे व सदर जनावराची यादी संबंधित पशुपालकांच्या नावासहीत (टॅग नंबरसह) पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती संबंधित यांना त्याच दिवशी देणे बंधनकारक आहे. संक्रमित असलेल्या/संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाच्या/जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
या आदेशाची अंमलबजावणी पोलिस अधिक्षक, जिल्हा पशुसंवर्धन, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
00000



