
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटावर ‘व्हीप’ बंधनकारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे स्पष्टीकरण..
राज्य प्रतिनिधी
विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असून विधिमंडळात शिवसेना हा एकच पक्ष आहे. त्यामुळे एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाहीत. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, आमदार भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद आहेत.
त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हे याच शिवसेना पक्षाचे आहेत. त्यामुळे भरत गोगावले यांचाच व्हीप त्यांना लागू होईल,’’ असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज स्पष्ट केले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी व्हीपबाबत स्पष्टीकरण दिले होते.
निकालानंतरही प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना नार्वेकर यांनी व्हीप बाबतची शंका दूर केली. ते म्हणाले, ‘‘मूळ राजकीय पक्षाबाबत निर्णय दिला असल्याने व्हीप म्हणून भरत गोगावले यांनाच मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे त्यांचाच व्हीप दोन्ही गटांना लागू होईल आणि तो बंधनकारक असेल. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांची नियुक्ती कायमस्वरूपी योग्य ठरवली आणि गोगावले यांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा गैरसमज पसरवला जातो आहे.
ज्यावेळी नरहरी झिरवळ यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना निवडले, त्यावेळी २१ जून २०२२ रोजी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचेच पत्र होते, एकनाथ शिंदे यांचे नव्हते. एकच राजकीय पक्ष असल्याचे वाटल्याने त्यांनी प्रभू आणि चौधरी यांची निवड केली गेली.
मात्र निर्णयावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की अध्यक्षांनी पहिल्यांदा राजकीय पक्ष कुणाचा, हे ठरवावे आणि त्यानंतर प्रतोद आणि विधिमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच निकाल दिला आहे.’’
विधिमंडळ पक्षाच्या बाबतीत व्हीप कोणाचा ठरवण्यासाठी ‘मूळ राजकीय पक्ष कोणाचा’ हे ठरवणे गरजेचे असल्याने मी सर्वप्रथम राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवले, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.



