
महासंस्कृती, महानाट्य महोत्सव; दि.२२ ते २५ सांस्कृतिक कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती व महानाट्य या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. सोमवार दि.१९ रोजी क्रांती चौकात शिवछत्रपती जयंती सोहळ्यापासून सुरुवात होणार आहे. दि.२२ ते २५ पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर वासियांना पाहता येणार आहेत.
या आयोजनात पारंपारिक कलांचे सादरीकरण, स्थानिक कलाकारांना वाव, शिवकालिन खेळ, महिलाचे पारंपारिक खेळ अशा विविध बाबींचा अंतर्भाव करण्यात आला असून सोमवार दि.१९ रोजी क्रांती चौकात ३५० विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य सादर करुन महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ होईल. त्यानंतर गुरुवार दि.२२ ते रविवार दि.२५ असे सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच अन्य अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत देण्यात आलेली कार्यक्रमांची रुपरेषा याप्रमाणे-
सोमवार दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ३५० विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य, सकाळी साडे आठ वा. स्थळः क्रांती चौक.
गुरुवार दि.२२ रोजी शिवछत्रपती वस्तू संग्रहालयास शालेय विद्यार्थ्यांची भेट. सायं.६ वा. आदर्श शिंदे यांचा संगित रजनी कार्यक्रम, स्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.
शुक्रवार दि.२३ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य रांगोळी- स्थळ- सिद्धार्थ उद्यान. सकाळी १० ते १२ विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन, दुपारी साडेबारा ते २ वा. पर्यंत आलाप वाद्यवृंदासह टीव्ही कलावंतांचा ऑर्केस्ट्रॉ, दुपारी ३ वा. महिलांचे पारंपारिक खेळ,स्थळ- सिद्धार्थ उद्यान. सायं. ६ वा.अवधुत गुप्ते संगित रजनी, स्थळ- मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खडकेश्वर,
शनिवार दि.२४ रोजी सकाळी १० ते १२ शिवकालीन क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन- स्थळ सिद्धार्थ उद्यान. सायं. ६ वा.नंदेश उमप संगित रजनी कार्यक्रम- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.
रविवार दि.२५ रोजी सायं ६ वा. ‘शिवबा’ महानाट्य सादरीकरण- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.
या सोबतच दि.२३ व २४ रोजी जिल्ह्यातील अभियांत्रिकी व औषध निर्मिती विभागाच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन सिद्धार्थ उद्यानात लावण्यात येणार असून ते ही नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. स्थानिक लोककलावंतांनाही दि.२२ ते २५ दरम्यान दररोज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान येथील मुख्य कार्यक्रमात सादरीकरणाची संधी दिली जाईल. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सगळ्यांना प्रवेश मोफत आहे,असेही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी स्पष्ट केले.
०००००



