
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०२३ प्रदान मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला
राज्य प्रतिनिधी
आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टी साठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान आज करण्यात आला.त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री शिंदे, म्हणाले की, अष्टपैलू, हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे. अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले
मुंबईतल्या फिल्मसिटीत शुटीगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर ‘वन विंडो सिस्टीम’चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतलाय. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नावे चित्र नाट्यगृह उभरण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्र्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेत, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.



