
प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता दि.30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदतवाढ,तर नुतनीकरण व नवीनकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी दि.01 जून पासून होणार सुरु
प्रतिनिधी:- सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांकरिता पुढील आदेशापर्यंत दि.30 एप्रिल 2024 ही सन 2023-24 करिताचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 ची नुतनीकरण (Renewal) व नवीन (Fresh) करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. 01 जून 2024 पासून सुरु होणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांनी दिली आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्जाचा भरणा केल्यानंतर महाविद्यालयांनी पुढील कार्यवाही करून अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. महाविद्यालय स्तरावरील अडचणी उदा. फी निश्चित होणे, अभ्यासक्रमास मान्यता मिळणे इ.बाबी संबंधित शैक्षणिक विभागाकडून प्रलंबित असल्यामुळे अशा अडचणी लक्षात घेऊन राज्यशासनाच्या मान्यतेने प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता दि.30 एप्रिल 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ प्रदान करण्यात आली आहे.
तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील 494 व विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गाचे 1 हजार 208 अर्ज मुदतवाढ दिलेल्या कालावधीत सन 2023-24 तसेच त्यापूर्वीचे प्रलंबित असलेले अर्ज ऑनलाईनरित्या निकाली काढण्यात यावेत, हे अर्ज विहीत वेळेत निकाली न काढल्यास असे अर्ज प्रणालीतून कायम स्वरुपी रद्द बातल (Auto Reject) होतील याची सर्वांनी दखल घ्यावी. तसेच सर्व महाविद्यालयामधील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असून विद्यार्थी शिष्यवृत्तीस वंचित राहिल्यास महाविद्यालय प्राचार्य हे व्यक्तीशः जबाबदार राहतील.
००००००००



