
शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, प्रतिनिधी नाफेडने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाफेडने ४ जानेवारी २०२४ पासून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू केले आहे. शेतकऱ्यांना नाफेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेता यावा याकरीता सदर पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवर नाव नोंदणी करून योजनांचा लाभ घेणे शक्य होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने नाफेडमार्फत दरवर्षी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी केली जाते. हंगाम २०२३-२४ मध्ये कडधान्य आणि तेलबियांचे बाजारभाव हे आधारभूत दरापेक्षा जास्त असल्यामुळे हमीभावाने खरेदी झाली नाही. मात्र हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात नाफेडच्या वतीने मका, तूर, चना, मूग, उडिद आणि सोयाबीन खरेदीकरीता शेतकऱ्यांनी नोंदणी करुन खरेदी करण्याबाबत नियोजन करावे. ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणीबाबत अडचणी आल्यास अथवा अधिक माहितीसाठी प्रतिनिधी दिनेश देशमुख संपर्क क्रमांक ९७६३३४४७१० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000



