
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शीव, मुंबई येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन,गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ऋषीमुनींनी दिलेला आत्मोन्नती करण्याचा दैवी मार्ग प्रशस्त करण्याचा संकल्प करूया ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. युगानुयुगे ही परंपरा भारतात अव्याहतपणे चालू आहे. या गुरु-शिष्य परंपरेचे कृतज्ञताभावाने स्मरण करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने गोकुळ सभागृह, गोकुळ मार्ग, शीव (पू.), मुंबई येथे रविवार, 21 जुलै या दिवशी सायं 6 ते 8 या वेळेत गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘गुरु-शिष्य परंपरा ही केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहे’, असे नाही, तर संगीत, कला, नृत्य, वेदाध्यायन आणि युद्धकला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहे. या गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेच्या कार्यातही योगदान दिले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ऋषीमुनींनी दिलेला आत्मोन्नती करण्याचा दैवी मार्ग प्रशस्त करण्याचा संकल्प करायला हवा. ‘गुरु-शिष्य परंपरा आणि सनातन धर्माची वैज्ञानिकता’ या विषयावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सर्व जिज्ञासू आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केले आहे.
१४ विद्या आणि ६४ कला यांचे ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीतून शिक्षण देण्याचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा संकल्प असून सध्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’कडून वेदशिक्षणाच्या माध्यमातून, तसेच चित्रकला, मूर्तीकला, संगीत आणि नृत्य आदी काही कलांच्या माध्यमातून साधना करणार्यांना ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने शिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९५ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११५ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या आध्यात्मिक संशोधनाविषयीही उपस्थित जिज्ञासूंना या कार्यक्रमात अवगत केले जाणार आहे, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आपला नम्र,



