vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

श्री.आप्पा ठाकूर यांच्या जीवनस्पर्शी गजलांनी गंधित झाला ‘मराठी भाषा गौरव दिन’*

*श्री.आप्पा ठाकूर यांच्या जीवनस्पर्शी गजलांनी गंधित झाला ‘मराठी भाषा गौरव दिन’*

 

    नवी मुंबई प्रतिनिधी-  जगातील सर्व भाषांवर प्रेम करतांना मायबोली मराठी भाषेवर आपली माया आहे अशा शब्दात मराठीचे महत्व सांगत नवी मुंबईचे उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण कुणाशीही संवाद साधतांना पहिल्यांदा मराठी भाषेतच बोलले पाहिजे, व त्याला ती भाषा समजत नसेल तर त्याला समजणा-या इतर भाषेचा आधार घेतला पाहिजे अशा शब्दात मराठी जपण्याची व विकसीत करण्याची आपली सामुहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.

          नवी मुंबइ महानगरपालिकेच्या वतीने 27 फेब्रुवारी या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिध्द गजलकार श्री. आप्पा ठाकूर यांच्या ‘गुंतलेले पाश’ या मराठी गजल सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, सहा.वैद्यकिय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, सहा.आयुक्त श्रीम. स्वरुपा परळीकर व श्रीम. दिपाली दिवेकर आणि अधिकारी, कर्मचारी व साहित्यप्रेमी रसिक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गजलकार श्री. आप्पा ठाकुर यांचा उपमहापौर श्री. दशरथ भगत यांच्या शुभहस्ते स्वागतपर सत्कार करण्यात आला.

          त्याचप्रमाणे नामांकित गजलकार असणारे नमुंमपा अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना नुकताच पुणे येथील रंगतसंगत व करम प्रतिष्ठा या संस्थांच्या वतीने ‘गजलमित्र’ हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गजलच्या क्षेत्रातील त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा उपमहापौर महोदयांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

          ‘दु:खालाही घट्ट उराशी धरता येते, आणिक त्याची सुंदर कविता करता येते’ असे जगण्याचे मर्म सांगणारी गजलकार आप्पा ठाकूर यांनी प्रेम, ममता, दु:ख, विरह, वेदना, भिती अशा विविध भाव भावनांचे उत्कट अविष्करण करणारी कविता अत्यंत प्रभावी रितीने सादर केली. जीवनाचे ‘गुंतलेले पाश’ मोकळे करतांना आजच्या जगण्यात विस्कळीत होत चाललेले नाते संबंध, हरवत चाललेली मूल्ये यावर संवेदनशील भाष्य करतांना त्यांनी समाजातील दांभिकतेवर शाब्दीक प्रहार केले. माणसाच्या अंतरंगाला हात घालतांनाच सामाजिक जाणिवांनाही त्यांनी हात घातला. त्यांनी गजलेतून विठ्ठलाला दिलेल्या सल्ल्याच्या अत्यंत लोकप्रिय गजलला रसिकांची प्रचंड दाद मिळाली.

          ‘मी कमी बोलतो मौनच माझी भाषा, शब्दांचा रतीब उगाच घालत नाही, पायांना माझ्या छंद सदा मातीचा, मी क्षणभर सुध्दा हवेत चालत नाही’ – असा निर्मळ भाव जपणा-या श्री. अप्पा ठाकूर यांच्या एकामागून एक सादर होणा-या गजलांतील शेरांनी रसिक भारावून गेले. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, पण तो मिळालाच तर तो पावसाचा मिळावा ही इच्छा बाळगणारे आप्पा दातृत्वाची वृत्ती अंतर्बाह्रय जगतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या गजल ऐकतांना जणू आपल्याच मनातले त्यांच्या शब्दांमधून उमटत आहे असा आभास रसिकांना होतो. त्यामुळे श्री. आप्पा ठाकूर यांनी सादर केलेल्या त्यांच्या सर्वच गजलांना रसिकांनी उत्कट दाद दिली.

           यानिमित्त आयोजित केलेल्या अभिनव ‘शब्दकोडे’ स्पर्धेमध्ये 42 अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

000000

संबंधित पोस्ट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. 

vishwatmaklokswamivarta

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करावी