
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत महानगरपालिका स्तरावरअर्ज स्विकारण्यास 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
सांगली, , (जि. मा. का.) : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज 31 जुलैपर्यंत सादर करण्याबाबत मुदत देण्यात आली होती. तथापि जेष्ठ नागरीकांना वैद्यकीय दाखला प्राप्त करुन घेण्यात येणाऱ्या अडचणी व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता महानगरपालिकास्तरावर अर्ज स्विकारण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
वय वर्षे 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ केंद्र. योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर 3 हजार रूपये रक्कम एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत.
अर्जासोबत विहीत स्वघोषणापत्रे, आधार कार्ड झेरॉक्स. उपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. अर्ज विनामुल्य असल्याने आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत व परिपूर्ण अर्ज त्यांचेकडेच विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000



