
श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहतात?
आध्यात्मिक वार्ता
श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या! आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे! त्यात पु्हा पार्वतीमातेचे पतीराज. शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी `गौरीहार’ पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल
पूर्वी स्त्रियाां घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे. अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करत. आजही करतात. त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो.
आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे. परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे. त्यामुळे त्याच्या संसाराला मदत होई. देण्याचा आनंद काय असतो, हे अशा व्रतामधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही, तर वाढ होते, मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न! ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.
मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणींना समाधान, तर मूठ मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून ताम्हनात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे.
अशी जुन्या-नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेपः सुखिन: सन्तु अर्थात सगळ्यांचे सुख, हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे. तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा.
यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी वाहायची शिवामूठ :१ ऑगस्ट : तांदूळ
‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।
वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ॥’ – ग्रंथ व्रत राज
अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी करून सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.
वरीलपैकी मंत्र शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’
श्रावणी सोमवार शिवमुठ अखंड तांदुळ
नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
“शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा” असे तीन वेळा म्हणावे.
दानाचे महत्त्व सांगणारी शिवामूठ
आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत-वैकल्ये महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो, ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर आपल्या यथाशक्ती त्यात भर घालून गरजूंना द्यावी.
श्रावणी सोमवारच्या दिवशी सायंकाळी शिवपुजन करून दहिभात जाडि खडिसाखर आणि खीर यांचा नैवेद्या वर बेलपत्र ठेवून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा
|| ॐ नमःशिवाय ||
संग्रह – वे.श्री.ईश्वर स्वामी होळीमठ ( ज्योतिष शास्त्री ) सोलापुर.



