
सर्व ग्रामपंचायतीमध्ये ३ नल-जल मित्रांची होणार नियुक्तीइच्छुकांनी तात्काळ ग्रामपंचायतशी संपर्क साधावा -मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
ठाणे,दजिमाका) :- जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी / प्लंबर , मेकॅनिक / फिटर व इलेक्ट्रिशियन / पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल-जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार आहे, यासाठी इच्छुकांनी आपापल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने व्हावी. या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत 3 नलजलमित्र यांची निवड करण्यात येणार आहे. वरील तिन्ही पदांसाठी प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्राम पंचायत 9 उमेदवारांची नामनिर्देशने राज्यस्तरावर करण्यासाठी ग्रामपंचायतने घेऊन त्यांची माहिती ॲपवर भरायची आहे. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावरून उमेदवारांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच पुढीलप्रमाणे आहेत. 1.प्लंबर /गवंडी, 2.मोटर मेकनिक / फिटर, व 3.इलेक्ट्रिशियन / पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच हे कौशल्य असलेल्या उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. म्हणून ग्रामसेवक यांनी उमेदवारांचे अर्ज प्राप्त करून घेऊन गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून त्याचे आयडेंटी साईज फोटो,आधार कार्ड आणि शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र संबंधित पंचायत समिती येथे सादर करावयाची आहे. त्यानंतर त्यांची प्रि- स्क्रिनिंग टेस्ट राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे. यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे अंतिम 9 पैकी 3 उमेदवार निवड करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि जल जीवन मिशन, जिल्हा परिषद, ठाणे चे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले आहे.
चौकट मजकूर –
पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती व शाश्वततेसाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता पात्र उमेदवारांनी ग्रामपंचायत सोबत संपर्क साधावा.



