महापरिनिर्वाणदिनी ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात वैचारिक अभिवादनासाठी भेटीचे आवाहन मुंबईत चैत्यभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्ञानस्मारकाची माहिती देणारा विशेष स्टॉल…
महापरिनिर्वाणदिनी ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात वैचारिक अभिवादनासाठी भेटीचे आवाहन मुंबईत चैत्यभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्ञानस्मारकाची माहिती देणारा विशेष स्टॉल…
नवी मुंबई प्रतिनिधी -: सेक्टर 15, ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातून ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांचा व्यापक प्रसार होत असल्याने ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेटी देऊन येथील सुविधांचे, त्यातही मुख्यत्वे येथील समृध्द ग्रंथालयाचे व चरित्र छायाचित्र दालनाचे कौतुक केले असून देशी-परदेशी पर्यटकांनीही आगळेवेगळे स्मारक म्हणून गौरव केला आहे.
5 डिसेंबर 2021 रोजी स्मारकातील वैविध्यपूर्ण सुविधांचे लोकार्पण झाले असून मागील 3 वर्षात येथील रजिस्टरला नोंद करुन तब्बल 3 लाख 22 हजार 402 पर्यटकांनी याठिकाणी भेटी दिल्या आहेत व बाबासाहेबांच्या विचारांना प्राधान्य देणारे अभिनव स्मारक म्हणून प्रशंसा केली आहे.
पुस्तकांसह डिजीटल सुविधायुक्त अत्याधुनिक ग्रंथालयामुळे ज्ञानस्मारक अशी ओळख दृढ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित तसेच त्यांच्या चरित्रावर व विचारांवर आधारित पुस्तकांप्रमाणेच याठिकाणी इतर महनीय व्यक्तींवरील 5 हजारहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय आधुनिक युगातील ऑनलाईन वाचनाची सवय लक्षात घेऊन येथे ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीची सुविधा आहे. समृध्द ग्रंथालय हा या ज्ञानस्मारकाचा आत्मा असून या माध्यमातून अभ्यासकांना व वाचकांना पुस्तकांचा खजिना मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्ञानाला महत्व देणारे बाबासाहेबांचे पुतळाविरहीत ज्ञानस्मारक ही ओळख अल्पावधीतच रुढ झाली आहे.
स्मारकामध्ये ‘विचारवेध’ आणि ‘जागर’ या व्याख्यान शृंखलांमुळे हे विचारांची आदानप्रदान करणारे ज्ञानकेंद्र म्हणून नावारुपाला आले असून स्मारकाला व्याख्यानानिमित्त भेटी देणाऱ्या नामवंत विचारवंत व साहित्यिकांनी देशातीलच नव्हे तर परदेशातील बाबासाहेबांच्या स्मारकापेक्षा हे स्मारक अत्यंत वेगळे असल्याचे अभिप्राय वेळोवेळी नोंदवले आहेत. येथील परिपूर्ण ई – लायब्ररी हा स्मारकाचा आत्मा असून या माध्यमातून अभ्यासकांना व वाचकांना विचारांचा खजिना विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना महत्व देणारे हे स्मारक बाबासाहेबांचे पुतळाविरहीत ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे.
बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणारे दुर्मीळ छायाचित्र दालन प्रेरणादायी- बाबासाहेबांचे संपूर्ण जीवनचरित्र उलगडणारी दूर्मीळ छायाचित्रे असणारे भव्यतम छायाचित्र दालन हे स्मारकाचे एक विशेष आकर्षण असून येथे बाबासाहेबांच्या जन्माच्या आधीपासून महापरिनिर्वाणापर्यंत विविध महत्वाच्या घटनांचा, प्रसंगांचा व कागदपत्रांचा ऐतिहासिक दस्तऐवज पाहता येणार आहे. प्रत्येक छायाचित्राखाली त्या छायाचित्राविषयीची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित करण्यात आली असून या माध्यमातून बाबासाहेबांचे चरित्र वाचल्याचे समाधानही छायाचित्र बघता बघता नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे या छायाचित्र दालनातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडतोच तसेच त्यापासून प्रेरणाही मिळते अशी भावना तेथे भेट देणारे असंख्य नागरिक व्यक्त करीत असतात.स्मारकात स्पेशल होलोग्राफिक प्रेझेंटेशन शोची व्यवस्था करण्यात आली असून या आभासी चलचित्र प्रणालीव्दारे बाबासाहेबांचे भाषण समोरासमोर ऐकण्याची सुविधा नागरिकांना भारावून टाकते. प्रत्यक्ष बाबासाहेब आपल्याशी बोलतात ही भावना शो बघून झाल्यानंतर नागरिक व्यक्त करीत असतात.
ध्यानकेंद्राच्या माध्यमातून लाभते आत्मिक समाधान – नागरिकांच्या भेटीचा अखंड ओघएकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र स्मारकातील वरच्या भागात असून त्या ठिकाणी ध्यानधारणेचे आनापान सत्र सुरु करण्यात आले आहे. धम्मविपुला केंद्र बेलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीपासून सुरु झालेल्या या ध्यानविषयक आनापान सत्राचा लाभ आत्तापर्यंत 48 हजार 325 नागरिकांनी घेतला आहे. स्मारकात असलेल्या 250 आसन क्षमतेच्या अत्याधुनिक वातानुकुलित सभागृहामध्ये व्याख्याने व इतर प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात.बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या नीबच्या आकाराचा लांबूनच नजरेत भरणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम लक्ष वेधून घेतो. यापासूनच स्मारकाच्या वेगळेपणाची नोंद नकळतपणे घेतली जाते.स्मारकाचे वेगळेपण लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचा ओघ सातत्याने सुरु असतो. स्मारकाला एकदा भेट दिलेले नागरिक याठिकाणी पुन्हा एकवार कुटुंबासह भेट देतातच शिवाय आपल्या परिचितांनाही आवर्जून भेट देण्यास सांगतात. त्यामुळे मागील तीन वर्षांत साधारणत: 3.25 लाख देशीपरदेशी नागरिकांनी नोंद करून स्मारकाला भेट दिली आहे व येथील व्यवस्था आणि सुविधांचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.: चैत्यभूमीवर विशेष स्टॉलव्दारे स्मारकाची माहिती प्रसारित करून ज्ञानस्मारकाला भेट देण्याचे आवाहन
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी देशापरदेशातून येणाऱ्या नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकातील विविध सुविधांची माहिती मिळावी यादृष्टीने चैत्यभूमीवर विशेष स्टॉल लावून ऐरोली, नवी मुंबई येथील ज्ञानस्मारकाची माहिती आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात येत आहे. चैत्यभूमीला भेट देणा-या नागरिकांनी मुंबईपासून जवळच असलेल्या या ज्ञानस्मारकालाही भेट दयावी व एक अलौकिक अनुभव आणि संस्मरणीय आठवण सोबत घेऊन जावी असे आवाहन स्टॉलवरून करण्यात येत आहे.
गतवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी मोठया संख्येने नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील ज्ञानस्मारकाला भेट दिली होती. यावर्षीही महानगरपालिकेने त्याठिकाणी आवश्यक सर्व सुविधा पूर्तता केली असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिेंदे यांनी केले आहे.