विमुक्त जाती, भटक्या जमातीतील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी महामंडळांची कर्ज योजना -वैयक्तिक कर्ज 10 लाख तर गटासाठी 50 लाखापर्यंत मिळतो कर्ज
राज्य प्रतिनिधी बुलढाणा, : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विजा, भज, विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थि विकास महामंडळ या दोन उपकंपनीमार्फत वडार व रामोशी समाजातील लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी सलंग्न व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक क्षेत्रासंबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुपये 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रुपये 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे, त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म 12 टक्क्यांपर्यंत लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करते. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत व थेट कर्ज योजनेअंतर्गत 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेकरीता महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.
या योजनेच्या अधिक महितीसाठी महामंडळाच्या कार्यालयात येवून संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छूक व्यक्ती व संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.000