ठाणे, प्रतिनिधी:- 12डिसेंबर 2024 रोजी अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, मार्डेफ ट्रस्ट, पुणे व आर्थिक साक्षरता केंद्र, ठाणे यांच्यावतीने मौजे नडगाव ग्रामपंचायत, नडगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील किसान विद्यालय व ज्युनियर कॉलेज नडगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला.
या शिबिरास 70 शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.अभिषेक पवार व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री.सुधांशूकुमार अश्विनी, ग्रामसचिव श्री.भरत डोंगरे, मुख्याध्यापक श्री.शिर्के, सरपंच कमल रेरा दुर्गे, ग्रामपंचायत ग्रामस्थ, शेतकरी वर्ग, महिला बचत गट सदस्य यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक श्रीमती मनीषा देवरे, आदिवासी विकास प्रतिष्ठानच्या श्रीमती प्रमिला माश्रम उपस्थित होत्या.
या मेळाव्यामध्ये अभिषेक पवार यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना बँक स्तरावरील विविध योजना हो किसान क्रेडिट कार्ड तसेच शेतीपूरक योजनांमधून आपला विकास शेतकरी बांधवांनी करावा याबाबत संवाद साधला.
नाबार्ड अंतर्गत शेतीविषयक योजनांबाबत श्री.सुधांशूकुमार अश्विनी यांनी वेअर हाऊस, भाजीपाला लागवड, वाडी प्रकल्प, डेअरी, पोल्ट्री, शेळीपालन याबाबत योजना व अनुदानांबाबत माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्र ठाणे निरीक्षक मनीषा देवरे यांनी मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याबाबत माहिती देवून शेतकरी वर्गाने या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रमिला मसराम यांनी मशरूम शेती व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण घेवून तरुणांनी अधिकाधिक या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन केले.
आर्थिक साक्षरता केंद्र समन्वयक सविता पावसकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आर्थिक साक्षरतेबाबत प्रबोधन केले.00000