
प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न..
ठाणे प्रतिनिधी
-ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे व नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नितीन मैंद, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, उपमहाव्यवस्थापक श्री.मांडके, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, लवकरच एस.टी च्या ताफ्यामध्ये 2 हजार 640 लालपरी नव्याने दाखल होत आहेत. या नव्या वर्षामध्ये राज्याच्या प्रत्येक कानाकोपाऱ्यात नव्या लालपरी दिमाखात धावताना दिसतील. याबरोबरच भाडेतत्वावरील 5 हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेत आहोत. एवढेच नव्हे तर 2 हजार 500 नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव एस.टी. ने शासनाकडे पाठविला असून त्याचा देखील पाठपुरावा करुन पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या बसेस एस.टी.च्या ताफ्यात दाखल होतील असे प्रयत्न केले जातील.



