संवाद तर्फे माहीम मध्ये संगीतोपचार म्युझिक थेरेपी ज्येष्ठांसाठी कार्यक्रम संपन्न
मुंबई प्रतिनिधी- संवाद ज्येष्ठ नागरिक संघाचा माहीम येथे साप्ताहिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रेसफुल लिविंग ह्या ज्येष्ठांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला बोलवण्यात आले होते.
सर्वप्रथम “संवाद” च्या आणि “फेसकॉम” च्या कार्यकारणी सदस्य श्रीमती उज्ज्वल ताई पाठारे यांनी सर्वांचे स्वागत करून ग्रेसफुल लिविंग च्या तन्वी जाधव आणि संगीतोपचार तज्ञ श्री किशोर गोलतकर या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला. या वेळच्या कार्यक्रमाचा विषय होता “संगीतोपचार” म्हणजेच म्युझिक थेरपी. कार्यक्रमाला फेस्कॉम चे जनसंपर्क प्रमुख श्री दिलीप गाडेकर यांची उपस्थिती लाभली. आषाढी एकादशी नुकतीच झाली असल्यामुळे श्री किशोर गोलतकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात अभंगापासून केली. ज्यांना ऐकू येते त्यांना संगीतोपचाराचा उपयोग होतो. प्राणी आणि वनस्पती हे सुद्धा संगीतोपचाराला प्रतिसाद देतात. डोळे बंद करून योग्य प्रकारे प्राणायाम केल्याने हृदयातील अनाहत नाद ऐकू शकतो. यामुळे आपले शरीर आणि मेंदू तंदुरुस्त राहतो. मन प्रसन्न होते असे श्री. गोलतकर यांनी सांगितले. चित्रपट गीत डोळे बंद करून ऐकल्याने आपल्या डोळ्यापुढे अभिनेता आणि तो चित्रपट दिसतो म्हणून नेहमी डोळे बंद ठेवून फक्त ध्वनी/सूर/ संगीत ऐकावे आणि विशेषतः आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करून ते ऐकल्याने आपले शरीराचे रोग सुद्धा बरे होऊ शकतात. आखडलेले स्नायू मोकळे होतात. त्यामुळे कुठल्याही औषधांची गरज पडत नाही असे श्री गोलतकरांकडून समजले. यामुळे एकाग्रता वाढून स्मरणशक्ती सुद्धा वाढते. दुःखी – दर्दभरी गाण्याची चाल बदलून आपण ती गाणी सकारात्मक कशी तयार करावीत याचे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. आनंदी होण्यासाठी संगीत हे एकमेव माध्यम आहे कंटाळा आल्यावर आवडती – सकारात्मक गाणी ऐकावीत. डाव्या मेंदूप्रमाणे उजवा मेंदू सुद्धा कार्यशील कसा ठेवावा याचे प्रात्यक्षिक केले गेले. “मेंदूचे अभ्यंग स्नान” म्हणजे काय हे सर्वांना नव्याने समजले.अशाप्रकारे संगीतोपचार पद्धती संबंधित त्यांनी फार सुंदररित्या माहिती दिली. संवादचे अध्यक्ष श्री सुधीर नाईक यांनी संगीतोपचार तज्ञ श्री. किशोर गोलतकर आणि ग्रेसफुल लिविंग च्या तन्वी जाधव यांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता श्रीमती उज्ज्वलताई पाठारे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी श्री किशोर गोलतकर यांनी वाढदिवसाचे गाणे म्हणून शुभचिंतन केली. तसेच संवादच्या सभासद सौ. स्वाती गोडबोले यांनी सुद्धा वाढदिवसा प्रित्यर्थ गाणे गाऊन शुभेच्छा प्रगट केल्या. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.