
अमृत आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन..
रायगड, प्रतिनिधी:- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रभोधिनी (अमृत), पुणे आणि उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (M.C.E.D) अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत लक्षित गटातील (ब्राह्मण, बनिया, राजपुरोहित, कायस्थ, एयंगार, पाटिदार, बंगाली, पटेल, मारवाडी, गुजराती, सिंधी, राजपुत, कोमटी, जाट, कानबी) आदि उमेदवारांसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक, रायगड-अलिबाग महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, (अमृत) शैलेश विनायक मराठे यांनी दिली आहे.
लक्षित गटातील युवक आणि युवतींसाठी अमृत-सुर्यमित्र (सौर), अमृत-आयात निर्यात आणि अमृत-निवास उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP 21 दिवस), अमृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (TEDP- 30 दिवस) आणि अमृत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (06 दिवस) हे तीन प्रकारचे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपात होणार आहे.
सदरील जे तांत्रिक प्रशिक्षण आहेत त्या संबंधित ट्रेडचे संपूर्ण प्रात्यक्षिक होणार असून सर्व ट्रेनिंगमध्ये जे तांत्रिक प्रशिक्षण आहेत तसेच उद्योजकीय मार्गदर्शन, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक, व्यवस्थापकीय आणि कायदेशीर माहिती, मार्केटिंग कौशल्य ग्राहकांशी संबंध तयार करून बाजारात व्यवसाय वाढविण्याचे तंत्र, शासनाच्या विविध योजना, बँकिंग प्रकल्प अहवाल, उद्योगात लागणारे कागदपत्रे, उद्योजकीय मानसिकता, उद्योजकीय गुणसंपदा इ. विषयांवर तज्ञामार्फत मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय उभारण्यासाठी एम.सी.ई.डी. मार्फत पाठपुरावा केला जाणार असून प्रशिक्षणानंतर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
अमृत लक्षित गटातील किमान 8 वी पास, कोणत्याही शासकीय कागदपत्रावर जातीचा उल्लेख, तहसीलदार याचे रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला इ. असणारे अमृत लक्षित गटातील इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी अमृत रायगड जिल्हा कार्यालय अलिबाग, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) कार्यालयाच्या बाजूला, अलिबाग, रायगड येथे निवड प्रक्रिया सुरू आहे.
अमृत लक्षित गटातील लाभार्थीची मुलाखतीव्दारे निवड होणार असून इच्छुकांनी आनंद विद्यागर एम.सी.ई.डी. प्रकल्प अधिकारी, रायगड मो.९४०३०७८७७२ किंवा शैलेश विनायक मराठे, जिल्हा व्यवस्थापक अमृत, अलिबाग रायगड मो. ९११२२२८७५९ यांच्याशी संपर्क साधून या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त युवक, युवती आणि उद्योजक तथा नवउद्योजक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रेय थारवे, विभागीय अधिकारी, कोकण विभाग (कोकण भवन) व श्रीकांत कुलकर्णी, राज्य समन्वयक एम. सी. ई. डी. यांनी केले आहे.
000000



