किमान आधारभूत किंमत खरेदी योजनामका खरेदीकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी…
सांगली, प्रतिनिधी: खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य मका खरेदीकरिता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी BeaM या पोर्टलवर 30 नोव्हेंबरअखेर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. ही माहिती जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू हंगामातील पीक पेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात बारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत तसेच मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह स्वतः हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे. चालू हंगामात मका पिकासाठी रक्कम रुपये 2400 आधारभूत किंमत जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी. मका खरेदी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सांगली जिल्ह्यात हंगाम 2025-26 मधील भरडधान्य मका खरेदीकरिता विष्णू आण्णा खरेदी विक्री संघ, सांगली, ॲड. आर. आर. पाटील शेतकरी खरेदी विक्री संघ, तासगाव, खानापूर तालुका खरेदी विक्री संघ, खानापूर, कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी व विष्णू आण्णा खरेदी विक्री संघ, जत ही खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.