vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

मुंबई, प्रतिनिधी : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये 6000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील पहिली फुल-स्टॅक क्वांटम हार्डवेअर प्रणाली ठरणार आहे. तसेच टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही कंपन्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर हॅक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशनमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

 

जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगून महाराष्ट्राला 2030 पर्यंत या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आयशर पुणे चे प्रो.उमाकांत रासोल, आयबीएम इंडियाचे संचालक अमित सिंघवी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच मंत्रालयातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, क्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाही, तर संगणक, संवाद व्यवस्था, आरोग्य, वित्त आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे पुढील पाऊल आहे. पारंपरिक संगणकातील ‘बिट्स’पासून ‘क्युबिट्स’पर्यंत झालेला प्रवास हा तंत्रज्ञानातील मोठा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

क्वांटमची संकल्पना सोप्या शब्दांत स्पष्ट करताना मंत्री ॲड.शेलार यांनी ‘परिमाण आणि मापन’ यावर आधारित उदाहरण दिले. नकाशावर दिसणारे अंतर आणि प्रत्यक्षातील अंतर यातील फरक समजून घेण्याची मानवी क्षमता हीच पुढे क्वांटम तंत्रज्ञानाच्या रूपात विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री ॲड.शेलार यांनी उद्योग क्षेत्र आणि तरुणांना या ‘क्वांटम क्रांतीत’ सहभागी होण्याचे आवाहन करत शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले. तसेच तंत्रज्ञानावर आपण आरूढ झालो नाही, तर तंत्रज्ञान आपल्यावर आरूढ होईल, असे सांगून त्यांनी क्वांटम युगात सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.

क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सुरक्षितता व संशोधन क्षेत्रात मोठे परिवर्तन- मुख्य सचिव राजेश अग्रवाल,क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सायबर सुरक्षितता, औषधनिर्मिती आणि शेतीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडणार असून, महाराष्ट्र शासन या क्षेत्रात सक्रियपणे काम करत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.क्वांटम संगणन पारंपरिक संगणनापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करत असून, क्यूबिट्सच्या साहाय्याने एकाच वेळी अनेक गणना करण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण अत्यल्प वेळेत करता येते, असे त्यांनी सांगितले.क्वांटम सुपरपोजिशनमुळे क्यूबिट एकाच वेळी शून्य आणि एक या दोन्ही स्थितीत राहू शकतो, ज्यामुळे संगणनाची गती घातांकी वाढते. याचा उपयोग औषध शोध, कृषी संशोधन आणि विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये होणार आहे. क्वांटम इनटँगलमेंट ही संकल्पना सुरक्षित संप्रेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यातील क्वांटम कम्युनिकेशन प्रणालींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. सध्याच्या क्रिप्टोग्राफी प्रणालींवर क्वांटम संगणनाचा प्रभाव पडू शकतो, मात्र त्याचवेळी क्वांटम आधारित सुरक्षितता उपाय विकसित होत असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.भारतामध्ये तसेच जागतिक स्तरावर क्वांटम संशोधन वेगाने प्रगती करत असून, 50 ते 100 क्यूबिट क्षमतेच्या प्रणाली विकसित होत आहेत. काही प्रगत संगणकांनी अत्यंत जटिल समस्या अल्पावधीत सोडविल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, विविध संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यासोबत सहकार्याने काम सुरू आहे. पुणे आणि मुंबई येथील प्रमुख संस्था या संशोधनात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, केंद्र सरकारकडूनही स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन