vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महिलासक्षमीकरण-जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड खाटेघरच्या सविता गायकर यांनी फुलवला मशरूम शेतीतून यशाचा मळा..

#महिलासक्षमीकरण-जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड खाटेघरच्या सविता गायकर यांनी फुलवला मशरूम शेतीतून यशाचा मळा..

 व्यावसायिक प्रतिनिधी    बदलत्या काळात महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता उद्योजकतेच्या क्षेत्रात भरारी घ्यावी, हे केंद्र व राज्य शासनाच्या ‘महिला सक्षमीकरण’ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खाटेघर येथील एका जिद्दी तरुणीने शेतीपूरक व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कु.सविता हरिश्चंद्र गायकऱ असे या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव असून, त्यांनी मशरूम शेतीसारख्या आधुनिक प्रयोगातून ग्रामीण भागात रोजगाराची नवी वाट दाखवली आहे.

   बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सविता यांच्या मनात स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तीव्र इच्छा होती. केवळ नोकरीच्या शोधात न राहता काहीतरी नाविन्यपूर्ण करावे, या विचारात असतानाच त्यांना रोजगार व ‘EAP’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे येथील ‘महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे’ची (RSETI) माहिती मिळाली. याच माहितीच्या जोरावर त्यांनी आपल्या स्वप्नांना खतपाणी घालण्याचे ठरवले आणि संस्थेतील ‘मशरूम शेती’ या 10 दिवसांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.  प्रशिक्षणाच्या या अल्प कालावधीत त्यांनी मशरूम उत्पादनाची तांत्रिक प्रक्रिया, त्याची शास्त्रोक्त देखभाल, पॅकेजिंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन व मार्केटिंगचे बारकावे आत्मसात केले. प्रशिक्षण पूर्ण होताच 22 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी 50 हजार रुपयांच्या प्राथमिक गुंतवणुकीतून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला काही अडचणी आल्या, परंतु प्रशिक्षणातून मिळालेला आत्मविश्वास आणि घेतलेली मेहनत यामुळे त्यांनी दर्जेदार मशरूमचे उत्पादन घेण्यात यश मिळवले.

आज सविता यांनी उत्पादित केलेल्या मशरूमला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी असून, ग्राहकांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या व्यवसायातून त्या दरमहा 10 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवत असून, त्यांनी स्वतःसाठी शाश्वत रोजगार निर्माण केला आहे. आर्थिक स्वावलंबनासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही मोठा बदल झाला आहे. “योग्य प्रशिक्षण आणि कष्टाची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते,” हा मंत्र त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे

     सविता यांचा हा यशस्वी प्रवास केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर परिसरातील इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात आपल्या या व्यवसायाचा विस्तार करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचा आणि इतर गरजू तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेचा खरा अर्थ सविता गायकर यांच्या या यशोगाथेमुळे अधोरेखित झाला आहे.0000

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; ३८ जणांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta

वैदिक मिलेट्स: पारंपरिक धान्याला आधुनिक आरोग्याची जोड देणारी शुभांगी सोनवळे यांची प्रेरणादायी यशोगाथा

vishwatmaklokswamivarta

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय : व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta