
नवी मुंबईमध्ये संस्कृतीचे शेवटच्या घटका,शहराचा कायापालट करणाऱ्या सिडको, नागरी सुविधा देणारी महापालिका व एमआयडीसी अशा कोणत्याच संस्थेने या संस्कृतीचे जतन केले नाही.
नवी मुंबई प्रतिनिधी
स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत तिसेक वर्षांपूर्वी गावखेडी आणि त्यांची समृद्ध संस्कृती होती, यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. मिठागरे, गुरे, बैलगाडी, होड्या यावरच तेव्हा येथील नागरिकांचे जीवन अवलंबून होते. त्यासोबतच किल्ले, नाट्य आणि विविध लोकसंगीतांनी हे जीवन बहरलेले होते; मात्र आधुनिकीकरणात त्यांचे जतन न झाल्याने या संस्कृतीचे आता केवळ अवशेष उरले असून त्याही आता शेवटच्या घटका मोजत आहेत.
नवी मुंबईची निर्मिती होण्यापूर्वी येथील खेड्यांमध्ये आगरी सरदारांचा इतिहास सांगणारे वैभवशाली पाच किल्ले होते. आगरी-कोळी बाण्यातील सजग कलावंतांचे दर्शन घडवणारी भजनी मंडळे, तमाशा-फड, धवलारीन आणि नाटके रचनारे सृजनशील साहित्यिक होते; मात्र आता नागरीकरणाच्या रेट्यात हे सर्व नाहीसे झाले आहे. शहराचा कायापालट करणाऱ्या सिडको, नागरी सुविधा देणारी महापालिका व पोटाला रोजगार देणारी एमआयडीसी अशा कोणत्याच संस्थेने या रुबाबदार संस्कृतीचे जतन केले नाही. त्यामुळे आता त्यांच्या खाणाखुणाही नामशेष होत आहेत.दोन हजार एकरावरील मिठागरेनवी मुंबईत दोन हजार एकर जागेत मिठागरे होती. लक्ष्मण भावे सावकार हे त्याचे मालक होते. आगरी-कोळी या मिठागरांमध्ये काम करत असत. सोनखार हे सर्वात मोठे मिठागर होते. सारसोळे ते वाशीपर्यंत पामबीच मार्गालगत सुमारे ११०० एकरावर हे मीठागर पसरले होते. सिडको आल्यावर १९८५ च्या आसपास ते नामशेष झाले.



