
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश
*गडचिरोली, प्रतिनिधी जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.



