
भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्तेउदघाटन..भाजपा मुळे माझी महाराष्ट्राभर ओळख – भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपा जगातील नंबर वन पक्ष – रावसाहेब पाटील दानवे
जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान” २०२६ अंतर्गत भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्ह्याच्या निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. १६ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीन व्हॅली रिसॉर्ट येथे करण्यात आले होते.
या निवासी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खा.रामराव वडकुते, डॉ.भागवत कराड, आ.बबनराव लोणीकर, प्रदेश महामंत्री सुनील राणे, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, माजी आ.कैलासजी गोरंटयाल, विलास बापू खरात, संजय केनेकर, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, किशोर शितोळे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, सुरेश केसापुरकर, विलास आण्णा दहिभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही विचारधारेवर चालणारी पक्षसंघटना असून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित व पक्षनिष्ठ असणे आवश्यक आहे. बूथस्तरावर कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी सातत्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाच्या वाढत्या संघटनशक्तीचा उल्लेख करताना त्यांनी “भाजपा हा आता हत्तीप्रमाणे मजबूत पक्ष झाला असून तो ज्या मार्गाने चालतो, त्या मार्गावर इतरांना जागा द्यावी लागते,” असे प्रतिपादन केले. आज भाजपा हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष बनला असून विविध निवडणुकांमध्ये भाजपाला मिळणारे यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली ओळख ही पक्षामुळेच असल्याचे नमूद करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, “आपली ओळख ही व्यक्ती म्हणून नसून भारतीय जनता पार्टीमुळे आहे.” प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर, वाहनावर कमळ चिन्ह लावावे तसेच सर्वसामान्य नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे काम करावे, असेही त्यांनी सांगितले. मन की बात कार्यक्रम प्रत्येक बूथवर नियमित आयोजित करण्याचे आवाहन करत त्यांनी निवडणुकांमध्ये शंभर टक्के मतदानासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, महिन्यातील शेवटचा रविवार हा पक्षकार्याला द्यावा तसेच एसआयआरसाठी पदाधिकाऱ्यांनी गतिमान पद्धतीने काम करावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्र अधिक सक्षम करण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बूथस्तरावर सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले असेही ते म्हणाले.
प्रशिक्षण वर्गाच्या उदघाटन सत्रात माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मार्गदर्शन करताना संघटन मजबुती, बूथस्तरावरील कामकाज आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच पक्षाचा इतिहास व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी विविध विषयांवर विचार मांडले यामध्ये कार्यकर्ता विकास, सांभाळ आणि दायित्व बोध, देशापुढील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना, स्थायी कार्यक्रम, बूथ व्यवस्थापन, ‘मन की बात व आयटी विभागाच्या कार्यपद्धती, पक्षाची कार्यपद्धती, विचार परिवारावर, वैचारिक अधिष्ठान, प्रत्यक्ष कार्यानुभव, मोदी सरकारच्या गरीब कल्याणकारी योजना व शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
या निवासी प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांना संवाद साधण्याची, वैचारिक देवाणघेवाण करण्याची तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची संधी मिळाली. यावेळी भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



