
आदिशक्तीच्या आगमनाचे वेध सार्वजनिक मंडळांनीही नवरात्रोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू
मुंबई प्रतिनिधी : गणेशोत्सवानंतर आता नागरिकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. यंदा रुग्ण संख्या कमी झाल्याने सरकारने कोरोना नियम शिथिल केले आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनीही नवरात्रोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. कार्यशाळांमध्ये आदिशक्तीचे रूप साकारताना मूर्तिकाराची लगबग सुरू आहे. इंधन दरवाढ, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा फटका बसल्याने यंदा देवीच्या मूर्तींचे दर १० ते १५ टक्क्यांनी वधारले आहेत; तर काही विक्रेत्यांनी कोलकाता, मध्य प्रदेशातून मूर्ती मागवल्या आहेत.
७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार असून देवीच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले झाले आहेत. अनेक मूर्तिशाळांमध्ये देवीच्या मूर्ती साकारण्यात आल्या असून रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. तसेच देवीच्या साजशृंगाराचेही काम जोमाने सुरू झाले आहे. दुर्गा माता, भवानी माता, महिषासूर मर्दिनी, कालिका माता, रेणुका, सप्तश्रृंगी माता, वैष्णव देवी अशी देवीचे रूपे मूर्तिकारांनी साकारली आहेत.
देवीचे रूप साकारताना डोळे, चेहरा, हास्य आदी कामे अत्यंत बारकाईने करावी लागतात, अशी माहिती मूर्तिकार संतोष चौलकर यांनी दिली. प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाचा काथ्या, मजुरी आदींच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा देवीच्या मूर्तीचे भावही १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
कोरोनामुळे मूर्तींची उंची चार फुटापर्यंत मर्यादित केली आहे. दीड हजार ते १० हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सव मंडळाकडून बुकिंग सुरू झाले आहे.- संतोष चौलकर, मूर्तिकार आगाऊ नोंदणी१ मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ२ आकारानुसार १,५०० ते १०,००० किंमत



