
पवई तलावाभोवती होणाऱ्या सायकल ट्रॅकमुळे मगरी आणि अन्य वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवून पर्यावरणप्रेमींनी या ट्रॅकला विरोध.
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : पवई तलावाभोवती होणाऱ्या सायकल ट्रॅकमुळे मगरी आणि अन्य वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवून पर्यावरणप्रेमींनी या ट्रॅकला विरोध केला आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे तक्रारही केली होती. त्याची दखल घेत सरकारला योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास निगम यांचा हा संयुक्त प्रकल्प असून, या कामासाठी पर्यावरण तज्ज्ञांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही तज्ज्ञांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. प्रकल्पासाठी वन आणि वन्यजीव विभागाची मंजुरी अनिवार्य असून त्याला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही, असे आर्द्र भूमी तक्रार निवारण समितीचे सदस्य तसेच वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.
आयआयटी येथील पीएच. डी.चा विद्यार्थी ओंकार सुपेकर यांनीही याबाबत तक्रार केली होती. ट्रॅकमुळे होणाऱ्या अडचणींबाबत केंद्रीय मंत्रालयाने २१ सप्टेंबर रोजी वन विभागा प्रधान सचिवांना पत्र लिहून उपक्रमांकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.



