अकोला, प्रतिनिधी रुग्णांना रुग्णालयाशी संलग्नित औषध विक्रेत्याकडूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषधे प्रशासनाचे सहायक आयुक्त, औषधे डॉ. अ. मा. माणिकराव यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय राज्य घटनेच्या कलम २१ अंतर्गत असलेल्या ‘जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचे संरक्षण’ यानुसार, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपध्दतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये असे स्पष्ट केले आहे की, आरोग्य आणि वैद्यकीय सेवांचा अधिकार हा कलम २१ अंतर्गत येणारा एक मूलभूत अधिकार आहे.
त्यानुसार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाशी संलग्नित, रुग्णालय इमारतीतील किंवा रुग्णालय परिसरातील विशिष्ट औषध विक्रेता आस्थापनेतूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. रुग्णालयाचे किंवा वैद्यकिय व्यावसायीकाने लिहिलेल्या औषधांची प्रिस्क्रिप्शन प्रत रुग्णास किंवा त्याचे नातेवाइकास द्यावी. रुग्णालयाने किंवा वैद्यकीय व्यावसायिकाने रुग्णास प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार देऊ नये.
लिहुन दिलेली औषधे कोणत्याही वैध औषध विक्रेत्याकडून घेण्याची मुभा असल्याची माहिती द्यावी. सर्व संबंधित रुग्णालयांनी फलक ठळक अक्षरात मराठी व इंग्रजी भाषेत दर्शनीय भागात प्रदर्शित करावा. त्यावर ‘रुग्णांना या रुग्णालयातील औषध विक्री दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती नाही. रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करु शकतात’ असे नमूद असावे.
या निर्देशाचे पालन न झाल्यास संबंधित संस्थेविरुध्द न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.