पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धआधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धआधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची व अग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही श्री. जाधव केले आहे.
या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा’ किंवा CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक व बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करून अंगठ्याचे प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, आधार संलग्नीकरण आणि प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची महत्त्वाची अट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातही ही प्रक्रिया अजून सुरु असून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.