
श्री तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली असतांनाही प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी*धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांना बजावली ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’*
प्रतिनिधी *धाराशिव / तुळजापूर :* श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले तब्बल २४७ किलो सोने आणि ३२९८ किलो चांदी वितळवण्याचा नव्याने ठराव करून मंदिर प्रशासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरी मागितली आहे. प्रशासन दावा आहे की, ते केवळ २००९ नंतरचे सोने वितळवणार आहेत; मात्र प्रशासनाचा हा दावा चुकीचा व न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे. उच्च न्यायालयाने २३ जानेवारी २०२५ रोजीच प्रशासनाची २००९ नंतरचे सोने वितळवण्याची याचिका फेटाळून लावली होती. तरीही नव्याने ठराव करून शासनाकडे परवानगी मागणे, हा न्यायालयाचा थेट अवमान आहे. या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगांवकर यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि विधी व न्याय विभागाचे सचिव यांना ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’ बजावली असून प्रशासनाला ‘क्रिमिनल कंटेम्प्ट’चा (फौजदारी अवमान) इशारा दिला आहे.



